नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा
पुणे-नाशिक महामार्गावर वारूळवाडी हद्दीतील सूर्या इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजूस असणाऱ्या जयहिंद टायर वर्क्समध्ये काम करणाऱ्या एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. प्राथमिक चौकशीत त्याचा खून झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
अब्बास (पुर्ण नाव माहीत नाही) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याच्याबरोबर काम करणारा कुमार याने त्याचा खून करून पळ काढला असल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वारूळवाडी याठिकाणी पुणे-नाशिक महामार्गावर मनोज रामकृष्ण कोनंगत यांचे गेल्या २५ वर्षापासून टायर पंक्चरचे व टायर विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी कुमार व अब्बास (पूर्ण नाव माहीत नाही) हे दोन व्यक्ती काम करत होते. यातील अब्बास हा दीड महिन्यापासून काम करीत आहे तर कुमार हा सात ते आठ महिन्यापासून काम करीत होता. दुकानाचे मालक मनोज यांनी दुकानाच्या वरील बाजूला असणारी खोली त्यांना राहण्यास दिली होती. अब्बास व कुमार या दोघांनाही दारू पिण्याची सवय होती व या वरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती.
दरम्यान, मनोज हे गुरुवारी (दि. १२) सकाळी आपले दुकानात आले असता दुकान बंद आढळून आले. त्यानंतर त्यांनी कामगारांना फोन करून पाहिला असता कुमार व अब्बास यांचे फोन स्विच ऑफ आले. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता खोलीला बाहेरून कडी होती. मनोजने दार उघडून पाहिले असता अब्बास खाली पडलेला आढळून आला व कुमार हा फरार असल्याचे दिसून आला. यावरून मनोज याने पोलिसांना कळवले, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अब्बास याला सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.