सरपंचपदाच्या खुर्चीची आत्तापासूनच ऊब
निवडणुका रंगतदार
राजकीय चर्चांना उधाण
नानगाव : दौंड तालुक्यातील मोठ्या गावांच्या निवडणुकांकडे आत्तापासूनच दौंडकर डोळे लावून बसले आहेत. या गावांतील निवडणुकीत काय होणार? कोणत्या गटाचा उमेदवार भारी ठरणार? कोण कशी राजकीय समीकरणे जुळणार? गावात कोणता गट सरस ठरणार? सरपंच होण्यासाठी कोण कोणाशी युती करणार? या चर्चेबरोबरच निवडणुकीत पैशांचा चुराडा आणि प्रचाराचा धुरळा उडणार असल्याच्या रंगतदार चर्चेला उधाण येऊ लागले आहे.
राहू, खामगाव, खुटबाव, वरवंड, पाटस, देऊळगाव राजे, रावणगाव, नानगाव, कानगाव अशा आणि इतर काही छोट्या- मोठ्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाची गावे येणार्या काही दिवसात निवडणुकांना सामोरे जात आहेत. मात्र, या मोठ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या खुर्चीसाठी आत्तापासूनच गावातील बड्याबड्या गावनेत्यांनी ’फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली असल्याबाबत गावातील पारावर राजकीय गप्पा रंगू लागल्या आहेत.
दौंड तालुक्यात राजकीयदृष्ट्या आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात हे दोन गट महत्त्वाचे, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता गट बाजी मारेल याबाबतही जोरदार चर्चा सुरू झाल्या असल्या तरी देखील काही ठिकाणी राजकीय गट- तट बाजूला ठेवून निवडणुका लढवल्या जातात. मात्र, जो कोणी सरपंचपदाला निवडून येईल तो कोणत्या गटाचा आहे, त्यावर देखील महत्त्वाचे गणित अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.मोठी गावे म्हटलं की मतदार, प्रभाग, सदस्य संख्या जास्त असते तसेच पुढील काही निवडणुकीत ही मोठी गावे महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे या मोठ्या गावांच्या निवडणुकांकडे शेजारच्या गावांसह तालुक्याचे लक्ष असते. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत अशा मोठ्या गावातील निवडणुकीत ‘प्या दारू, खा मटण आणि दाबा बटन’ हा फॉर्मुला महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे निवडणुकीत समोरासमोर उभ्या असलेल्या उमेदवारांचा खिसा त्यांना कायमच गरम ठेवावा लागतो. मतदान झाल्यावर निकाल काहीही लागेल, मात्र निवडणूक काळात खर्च हा करावाच लागतो अशीदेखील चर्चा ठिकठिकाणी सुरू आहे.
येणार्या निवडणुकीत प्रथमच ही गावे जनतेतून सरपंच निवडणूक प्रक्रियेला सामोरे जात आहेत. सदस्य हे आपापल्या प्रभागातून निवडणूक लढणार आणि त्या उमेदवाराला त्याच प्रभागातील मतदार मतदान करणार, मात्र सरपंचपदासाठी उभे असलेल्या उमेदवारांना गावातील सर्वच प्रभागातील मतदार मतदान करणार, तर या उमेदवारांना सर्व गावांमध्ये प्रचार करावा लागणार. त्यामुळे सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना चांगलाच खिसा गरम ठेवावा लागणार असून मतदार आत्तापासूनच “सरपंच, होऊ द्या खर्च ” असे बोलू लागले आहेत.
निवडणुकीच बिगुल वाजला की, बर्याच मंडळींच्या अंगामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागतात. त्यातच काही जण सरपंचपदाचे ’फिक्स’ उमेदवार असतात, मात्र समोरच्या उमेदवाराला पडणारी मते कमी करण्यासाठी एखादा वेगळाच उमेदवार खर्च करून उभा केला जातो. त्यामुळे आत्तापासूनच समोरचा कोण उभा राहिल्यावर कोणाला मते खाण्यासाठी उभं करायचं याचे गणित देखील सोडविण्याचा काही जण राजकीय फंडा वापरण्याच्या तयारीत आहेत.फफ
मोठ्या गावातील सरपंचपद आपल्याकडे आल्यावर तालुक्यातील राजकीय पटलावर आपले नाव चर्चेत रहाते आणि पुढील काही निवडणुकीत अशा सरपंच मंडळींना विश्वासात घेऊन काही कामे वरिष्ठ नेते करत असतात, त्यामुळे मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगतदार ठरतात.