पुणे

दौंड तालुक्यात महावितरणच्या कारभाराचा खेळखंडोबा

अमृता चौगुले

नानगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील शेतीला मिळणारा वीजपुरवठा सध्या पुर्ण क्षमतेने मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत. विस्कळीत कामकाजामुळे शेतकरी व शेतीपीके अडचणीत आली आहेत. याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्यामुळेच हे प्रकार घडत असल्याचे मत माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुका व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने दापोडी (ता.दौंड) येथील महावितरण कार्यालयावर दि.१३ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दापोडी टोलनाका ते महावितरण कार्यालय इथपर्यंत पायी चालत घोषणा देण्यात आल्या कार्यालय दरवाजात यावेळी मोर्चेकऱ्यांनी सभा घेत आपल्या आडचणी मांडल्या, यावेळी थोरात बोलत होते.

थोरात पुढे म्हणाले, मी आमदार असताना तालुक्यात चार सबस्टेशन आणि सत्तावीसशे विद्युत रोहित्र बसविण्यात आले आणि सध्या साधे रोहित्रांना आँईल मिळत नाही, त्यामुळे रोहित्र बंद असून शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वारकऱ्यांच्यावर लाठीमार होतोय आणि सरकार म्हणतयं लाठीमार झाला नाही त्यामुळे आशा गोष्टींचा निषेध करणे गरजेचे असून यावेळी या गोष्टीचा उपस्थितांकडून निषेध देखील करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार म्हणाले महावितरणचे अधिकारी व सरकारला जागे करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.सध्या उसाच्या लागण्यांचे दिवस असून वीजेअभावी लागण्या खोळंबून पडल्या आहेत.राहुबेट परिसरात देखील वीजेची मोठी समस्या असून रोहित्रांची देखील अडचणी असल्याचे मत सखाराम शिंदे यांनी व्यक्त केले.

दोन तीन दिवसापूर्वी पारगाव ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते त्यामुळे संबंधीत विभागाने निवेदनाची दखल घेत वीजपुरवठा सुरळीत केला मात्र याच प्रमाणे पुढील काळात वीजपुरवठा ठेवावा असे संभाजी ताकवणे यांनी मत व्यक्त केले.जून जुलै महिन्यात पाण्याची अडचण असते त्यातच वीजेची समस्या निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे मत पोपटभाई ताकवणे यांनी व्यक्त केले.

यावेळी विरधवल जगदाळे, हेमलता फडके, मिना धायगुडे,गणेश थोरात, विकास खळदकर,सागर फडके, रामभाऊ टुले,विश्वास भोसले, अजित शितोळे, बाळासाहेब निवंगुने, दिलीप हंडाळ, विजय चव्हाण, विकास ताकवले, वंदना मोहिते, शिवाजी वाघोले, भाऊसाहेब ढमढेरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.यावेळी महावितरण कार्यालयातील उपस्थित अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

चौफुला – न्हावरा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून छोटे मोठे अपघात देखील होत आहेत. नागरीकांनी अखेर रस्ता बदलून प्रवास सुरु केला मात्र रस्त्यावरील खड्डे बुजले नसल्याची खंत यावेळी अनेकांनी बोलून दाखवली.

सतत वीज खंडित

सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेती बरोबर गावातील घराघरापर्यंत वीजेची समस्या भेडसावत आहे.उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना तसेच रात्रीच्या वेळी वीज जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.वीज गेल्यावर संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना फोनवर संपर्क साधल्यास मुजोरीची उत्तरे दिली जातात तर कधी त्यांचा फोन देखील बंद असल्याने मोठ्या अडचणी येत असल्याची खंत यावेळी मांडण्यात आली.

SCROLL FOR NEXT