Fetal Determination Pudhari
पुणे

Illegal Sex Determination Racket: दौंडमध्ये गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टर व एजंटला अटक

बेकायदा गर्भपात व प्रतिबंधित औषध पुरवठा प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

केडगाव: दौंड तालुक्यात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान व स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटप्रकरणी यवत पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आणखी दोन प्रमुख आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींत पारगाव येथील डॉक्टर आणि रॅकेटमधील एजंटचा समावेश आहे. या दोघांना दौंड न्यायालयाने १ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली.

आरोपींत पारगाव येथील मंगलमूर्ती हॉस्पिटलचे डॉ. सुमंत तुकाराम शितोळे (वय ३८) आणि वासुंदे येथील बापूराव पंढरीनाथ जांबळे (वय ५७) यांचा समावेश आहे. तपासात डॉ. शितोळे हे मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी यांच्याकडून बेकायदेशीर गर्भलिंग निदान झालेल्या महिलांचा आपल्या रुग्णालयात बेकायदा गर्भपात करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर बापूराव जांबळे हा रॅकेटमध्ये एजंट म्हणून कार्यरत होता.

तो बेकायदेशीर गर्भपातासाठी लागणारी प्रतिबंधित औषधे व इंजेक्शन मुख्य आरोपींना देत असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, उपअधीक्षक राजेंद्र मायने, उपअधीक्षक बापूसाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक तथा एसआयटीचे मुख्य तपासी अधिकारी संतोष तासगावकर हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT