दौंड: येथील बंगला साइट परिसरात मनोरंजन क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर दौंड पोलिसांनी छापा टाकून तब्बल ३६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि प्लास्टिकच्या नाण्यांसह एकूण ३ लाख ९२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. ५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहरातील बंगला साइट परिसरात 'भैरवनाथ सांस्कृतिक व क्रीडा मंडळ, खडकत (ता. आष्टी, जि. बीड) संचालित मनोरंजन क्लब, दौंड' या नावाखाली पत्राशेडसदृश बंदिस्त इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला.
या ठिकाणी काही जणांकडून पैसे स्वीकारून त्याबदल्यात वेगवेगळ्या दरांचे प्लास्टिकचे कॉइन देण्यात येत होते. या कॉइनच्या माध्यमातून पत्त्यांचा बेकायदा जुगार खेळला व खेळविला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कारवाईदरम्यान ३६ जण जुगाराच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी पोलिस हवालदार आसिफ दिलावर सय्यद यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ व ५ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ६५ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात विनोद ऊर्फ जब्बार दत्तू जाधव, संतोष श्रीरंग विटकर, योगेश खंडू शेंडे, केतन रत्नदीप सोनवणे, कचरू मधुकर शेळके, राजू दत्ताराम पवार, सुशील पीटर हारगुडे, आकाश आनंद लोडी, वैभव श्रीकांत शेलार, प्रमोद चिमाजी सोनवणे, जगन्नाथ राम काळे, जितेंद्र नागनाथ हजारे यांच्यासह एकूण ३६ जणांचा समावेश आहे.
आरोपींमध्ये दौंड, बारामती, कर्जत, श्रीगोंदा, हवेली आदी भागांतील तसेच बिहार व झारखंड राज्यातील काही व्यक्तींचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या कारवाईत ३ लाख ९२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.