पुणे

दुर्दैवी ! सावत्र आईच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : घरातील किरकोळ कारणावरून सावत्र आईने मुलीला बांबू आणि फळीने बेदम मारहाण केली. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर आईने मुलगी फरशीवरून पडल्याचे खोटे सांगून रुग्णालय आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शिवकॉलनी, थेरगाव येथे घडली. याप्रकरणी सहायक निरीक्षक बालाजी ठाकूर यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 30 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील किराणा सामान संपले. सामान संपण्यापूर्वी तू मला का सांगितले नाही, असे म्हणत आरोपी सावत्र आईने 13 वर्षीय मुलीला बांबू आणि फळीने बेदम मारहाण केली. यामध्ये मुलीचा हात, पाय, पाठ आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी आईने मुलीला थेरगाव येथील महापालिका रुग्णालयात दाखल केले. मुलगी घरात पायर्‍यांवरून घसरून पडली असल्याचे आरोपी आईने डॉक्टरांना सांगितले.

डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाहणी केली असता मुलीच्या शरीरावर मारहाणीचे व्रण दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी माहिती देणार्‍या सावत्र आईकडे चौकशी केली असता तिनेच मारहाण केल्याची कबुली दिली.
आरोपी महिलेचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दरम्यान पतीचे निधन झाले. पतीला पहिल्या पत्नीपासून चार अपत्य आहेत. सर्वात मोठी मुलगी 13 वर्षांची होती. घरातील बहुतांश कामे मुलीलाच करावी लागत होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT