दौंडमध्ये कुल-थोरात राजकीय वैर पुन्हा जोर धरणार Pudhari
पुणे

Daund Politics: दौंडमध्ये कुल-थोरात राजकीय वैर पुन्हा जोर धरणार

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौंडमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

रामदास डोंबे

खोर: दौंड तालुक्यात माजी आमदार रमेश थोरात यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घरवापसी केल्याने दौंड तालुक्यातील जुने कुल-थोरात राजकीय घराण्यांचे वैर पुन्हा जोर धरणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौंडमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.

माजी आमदार थोरात यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करून त्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. आता त्यास सोडचिठ्ठी देत त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनःप्रवेश केला आहे. (Latest Pune News)

या पक्षात आधीच माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, युवक अध्यक्ष सागर फडके, शहराध्यक्ष निखिल स्वामी, गुरुमुख नारंग आणि महिला अध्यक्षा ज्योती झुरुंगे, अनिल नागवडे, विकास खळदकर ही नेतेमंडळी सक्रिय आहेत.

दौंड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्षपदी नितीन दोरगे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर 1 जुलै रोजी अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत होण्याच्या दृष्टीने ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. रमेश थोरात यांच्या पुनःप्रवेशामुळे मोठी बळकटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दौंड तालुक्यात मिळाली आहे. तालुक्यात मागील काही दिवसात सुरू झालेल्या अंतर्गत गटबाजीचा पुन्हा समेट होण्याची चिन्हे आहेत.

प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी तर दौंड तालुक्यात अजित पवार आल्यावर फेसबुक पोस्ट करीत अजित पवार यांचा सत्कार करतानाचा फोटो टाकत ’सदैव आपल्या नेतृत्वाशी एकनिष्ठ असून, तुम्ही घालाल तोच मार्ग - आम्ही चालणार निर्धाराने’ असे म्हणणे मांडत रमेश थोरात यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे संकेत दिले आहेत.

मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रमेश थोरात यांचे तालुक्यात वर्चस्व होते. बाजार समितीवर आमदार कुल यांचे नियंत्रण असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आमदार राहुल कुल बाजी मारणार का? की पुन्हा माजी आमदार रमेश थोरात आपले वर्चस्व प्रस्थापित करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दौंड तालुक्याचे राजकारण कुल - थोरात यांच्याच भोवती फिरत राहणार हे मात्र तितकेच सत्य आहे.

पोलिस- प्रशासकीय यंत्रणेची कसोटी लागणार

रमेश थोरात यांनी पुन्हा राज्यात सत्ताधारी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील पोलिस अधिकार्‍यांपासून प्रशासकीय यंत्रणेतील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी मात्र आता मोठ्या कात्रीत सापडणार आहेत, कारण आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात या दोघांचाही प्रशासनावर वचक बसवण्यात हातखंड आहे, त्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये हे दोघेही अधिकार्‍यांना फोन करत राहणार आणि त्यातून अधिकार्‍यांना मार्ग काढत काम करावे लागणार. या दोघांचाही राज्यातील सर्वोच्च पदावर बसलेल्या नेत्यांशी थेट संपर्क असल्यामुळे अधिकार्‍यांची मात्र मोठी कोंडी होणार आहे, याचा अनुभव मागील काळात येथील प्रशासकीय यंत्रणेला मिळाला आहेच. आता यापुढे काय होईल हे पाहणे मोठे उद्बोधक ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT