इंदापुरात जल्लोष...! आ. दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच फटाक्यांची आतषबाजी Pudhari
पुणे

इंदापुरात जल्लोष...! आ. दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच फटाक्यांची आतषबाजी

पेढे आणि लाडू वाटून आनंदोत्सव साजरा

पुढारी वृत्तसेवा

Indapur Political News: इंदापूर तालुक्याचे तिसर्‍यांदा प्रतिनिधित्व करणारे आमदार दत्तात्रय भरणे यांनी नागपूर येथे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच शहरातील बाबा चौकात जल्लोष करण्यात आला. रविवारी (दि. 15) इंदापूर शहरातील बाबा चौक येथे भगवानराव भरणे पतसंस्थेसमोर एलईडी स्क्रीनवर हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी सोय केल्याने इंदापूरकरांनी सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शनिवारी रात्री अनेक इंदापूरकर नागपूर येथे दाखल झाले होते, हे विशेष.

सायंकाळी सव्वा पाचवाजता आमदार दत्तात्रय भरणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 19 वे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताच इंदापूरकरांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करत एकमेकांना पेढे आणि लाडू भरून आनंद साजरा केला.

नूतन कॅबिनेट मंत्री भरणे यांनी सलग तिसर्‍यांदा माजी सहकारमंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केल्याने त्यांना मंत्रिपद निश्चित मानले जात होते.

सन 2019 मध्ये भरणे यांनी सार्वजनिक बांधकाम, वन, दुग्ध, पशुसंवर्धन तसेच मत्स्य या खात्यांसह राज्यमंत्रिपद भूषविले होते. तसेच, ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व त्याच पक्षातील बंडखोर अपक्ष उमेदवार प्रवीण माने या तिरंगी लढतीमध्ये 19 हजार मतांनी विजय मिळविला. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते.

दरम्यान, नागपूर येथे शपथ विधी सोहळ्यात येथे आ. भरणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच इंदापूर शहरासह तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच गुलाल उधळून, एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

जास्तीत जास्त विकास करणार : भरणे

कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दै. ‘पुढारी’शी बोलताना मंत्री भरणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे मी आभार मानतो.

जे खाते मिळेल, त्याच्या माध्यमातून या राज्याची आणि इंदापूर तालुक्याच्या जनतेची जेवढी काही प्रामाणिकपणे सेवा करता येईल, तेवढी मी निश्चितपणे करेन. जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास नवनियुक्त मंत्री भरणे यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT