पुणे

कर्मयोगी, निरा भिमा ने थकीत उसाचे बिले व्याजासहित द्यावीत; माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मागणी

अमृता चौगुले

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: साखर कारखाने सुरू होऊन चार महिने उलटले तरीही शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या ऊसाचे पैसे कर्मयोगी व निराभिमा सहकारी साखर कारखान्याने दिलेले नाहीत. महाराष्ट्रात ऊस बिल थकविणारे हे दोनच कारखाने आहेत. जिल्हा बँकेने कारखान्यास नुकताच कर्ज पुरवठा केला असल्याने तातडीने व्याजासहित थकीत ऊस बिले द्यावीत, अशी मागणी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. शनिवारी( दि. 11) इंदापूर येथे पुणे जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

पुढे बोलताना आमदार भरणे म्हणाले की, महावितरणकडून वीज तोडणी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची उभी पिके जळून जाणार आहेत. शेतकऱ्यांकडे विज बिल भरण्यासाठी देखील पैसे नाहीत. मात्र तालुक्यातील दोन सहकारी  साखर कारखान्यांनी चार महिने ऊसाचे गाळप करून देखील गाळप झालेल्या उसाचे पैसे दिलेले नाहीत. ऊसाचे पैसे देण्याच्या विलंबाबाबत जिल्हा बँक कर्ज देण्यासाठी अडवणूक करत असल्याचा आरोप करत बँकेवर खापर फोडले जात आहे. मात्र, भरणे यांनी विरोधक हे स्वतःची चूक आणि  पाप झाकण्यासाठी बँकेवर आरोप करत आहेत असे स्पष्ट केले. तसेच कर्ज प्रक्रियेची माहिती  पत्रकार परिषदेमध्ये दिली.

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी  साखर कारखान्याने यापूर्वी ठाणे बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यानंतर कारखाना चार महिने सुरू झाला. ठाणे बँकेनंतर जिल्हा बँकेकडे कर्मयोगीच्या कर्जासाठीचा प्रस्ताव आला. त्यानंतर संचालक मंडळाने तातडीने बैठक घेऊन 200 कोटी रुपये मंजूर केले. इतर बँकांचे कर्ज असल्याने त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी बँकेने कारखान्यास ते पत्र देण्यास सांगितले. कारखान्याने जे ना हरकत प्रमाणपत्र दिले ते परिपूर्ण नव्हते. त्यामुळे नवीन पत्र देण्यास सांगितले. 31 जानेवारी रोजी ते पत्र बँकेस मिळाले. त्यानंतर बँकेचे अधिकारी ज्या साखर गोडाऊनच्या तारणावर कर्ज देणार होते, ते पाहण्यासाठी गेले त्यावेळी कारखान्याने तारण दिलेल्या गोडाऊनमधील साखरेच्या पोत्याची थापी व्यवस्थित नव्हती. ती व्यवस्थित करण्यास सांगितली.
त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी गोडाऊनची पाहणी केली. मात्र कारखान्याकडून दिलेल्या साखर पोत्यांची संख्या व उपलब्ध असणाऱ्या साखर पोत्यातमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली. याची सर्व आकडेवारी माझ्याकडे आहे. मात्र मी सध्या ती सांगणार नाही. योग्य वेळेस ती देखील सांगणार आहे.

कारखान्याकडून कर्ज प्रक्रियेची आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सादर करताच दुसऱ्या दिवशी कर्ज मंजूर केले आहे. सध्या कारखान्यास दोन लाख छत्तीस हजार साखर पोत्यांवरती कर्ज दिलेले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेकडून कर्जासाठी अडवणूक करत असल्याचा विरोधकांचा आरोप व अपप्रचार चुकीचा असल्याचे सांगत त्यांचे पाप झाकण्यासाठी जिल्हा बँकेवर आरोप करत असल्याचा टोला विरोधकांना  भरणे यांनी लगावला.

अडचणीत आलेले भीमा पाटस ,आदिनाथ साखर कारखाने कर्ज न घेता काटा पेमेंट करत आहेत. तसे येथे का होत नाही, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यापुढे सर्व सभासदांनी साखरेसह उपपदार्थ निर्मितीची विक्री व  उत्पन्न किती  मिळाले. इतर कारखान्याने कोणत्या दराने विक्री केली. कारखान्यामध्ये लागणाऱ्या मशनिरीची कोणत्या दराने खरेदी केली. याची माहिती सभासदांना श्वेतपत्रिकेद्वारे मिळाली पाहिजे, असे म्हणत आणि विरोधकांवर टीकेची जोड उठवत भरणे यांनी जिल्हा बँकेवर होत असणाऱ्या आरोपांचे खंडन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT