पुणे: स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीआवर बलात्कार करणार्या आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याला याप्रकरणी अटक करून 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी (दि. 12) त्याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबत एका 26 वर्षीय पीडित तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दि. 25 फेब्रुवारी रोजी आपण कंडक्टर असल्याचे खोटे सांगून दत्तात्रय गाडेने तिला तिथे थांबलेल्या शिवशाही बसमध्ये बसण्यास सांगितले. पीडिता बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजा देखील बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नाहीये, मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे, अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपीने पीडितेला बसच्या सीटवर ढकलून दिले अन् तिच्यावर दोनदा अत्याचार केला.
आरोपी दत्ता बसमधून उतरल्यानंतर पीडितेने बसने गावाला जात असताना तिच्या मित्राला आणि बहिणीला फोनद्वारे तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितल्याचे फिर्यादीवरून समोर आले होते. यादरम्यान पोलिसांना गुंगारा देणार्या आरोपीला उसाच्या शेतात लपून राहिलेल्या गाडेला दि. 28 च्या रात्री सव्वाच्या सुमारास बेड्या ठोकण्यात आल्या.
दरम्यान, त्याच्यावर यापूर्वी सहा लूटमारीचे गुन्हे देखील दाखल असल्याचे समोर आले होते. या सहापैकी पाच गुन्ह्यांमध्ये महिलाच त्याच्या टार्गेटवर असल्याचे तपास अधिकार्याने न्यायालयात सांगितले आणि त्याला पोलिस कोठडीची मागणी केली होती. दरम्यान, त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या वैद्यकीय चाचणीबरोबर डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहे.
पोलिस कोठडीदरम्यान त्याला घटनास्थळावर नेण्यात आले. तो ज्या शेतात लपून बसला होता, त्या शेताची पाहणी करून पुरावा गोळा करण्यात आला. यादरम्यान तो ज्यांना ज्यांना भेटला, त्यातील खटल्याच्या अनुषंगाने जबाब नोंदविण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या आवारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याद़ृष्टीने बुधवारी परिसरात चोख बंदोबस्तात दत्ता गाडेला न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गाडेची न्यायालयीन कोठडी मागण्यासंबंधी अहवाल न्यायालयात सादर केला. या वेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला कपडे पुरविण्याची मागणी केली तसेच न्यायालयाने आरोपीला पोलिसांबद्दल काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्या वेळी आरोपीने नाही असे सांगितले.
दरम्यान, आरोपीचे वकील पोटे यांनी न्यायालयाकडे न्यायालयातच आरोपीशी बोलण्याची संधी मिळण्याची मागणी केली.या वेळी न्यायालयाने सुरुवातीला कारागृहात जाऊन भेटा, असे सांगितले. त्यावर वकिलांनी येथेच गाडेला भेटण्याबाबत विनवणी केली. त्यावर न्यायालयाने अॅड. पोटे यांना भेटण्याची संधी दिली. या वेळी गाडेच्या वतीने अॅड. वाजेद खान बिडकर हे देखील उपस्थित होते, तर असीम सरोदेही पीडितेच्या वतीने उपस्थित होते.
सरकारी वकील म्हणून अॅड. सरोदे यांची मागणी
स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडितेची विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. असिम सरोदे यांची मागणी करण्यात आली आहे. तसा पत्रव्यवहार पीडित तरुणीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केला आहे.
अद्यापही मोबाईल मिळेना
ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दत्तात्रय गाडे याच्याजवळ जो मोबाईल होता तो अद्यापही पोलिसांना सापडला नाही. त्या मोबाईलचा शोध सध्या सुरू आहे.
आत्तापर्यंत तपासात काय झाले?
घटनास्थळाचा पंचनामा
पीडित तरुणीचा न्यायालयासमोर जबाब
प्रत्यक्षदर्शी, इतर साक्षीदारांकडे चौकशी
आरोपी, फिर्यादीचे कपडे जप्त
सायंटिफिक अॅनालिसिससाठी कपडे पाठविले
आरोपी व फिर्यादीचे डीएनए सॅम्पल घेतले
गुन्ह्यात बीएनएसचे 64 (2) एम, 115 (2), 127 (2)
आरोपीविरुद्ध 7 गुन्ह्यांची माहिती मिळवली