पुणे

शिरूरमधील डाटा एन्ट्री ऑपरेटर संपावर

अमृता चौगुले

निमोणे : पुढारी वृत्तसेवा : आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटरांना कामावरुन कमी केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली शिरूर तालुक्यातील डाटा एंट्री ऑपरेटर बेमुदत संपावर गेल्यामुळे तालुक्यातील आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. 'शासन आपल्या दारी' आणि 'आम्ही शासनाच्या दारी' असूनही शिंदे सरकार भेटीपासून वंचित असल्याची भावना आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोना काळात जिवाची बाजी लावून आरोग्यसेवक तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर सरकारने यशस्वी अकॅडमीमार्फत शिकवू उमेदवार म्हणून या डाटा ऑपरेटर्सना नवनियुक्ती दिली. मात्र, कंपनीने या कर्मचार्‍यांना दोनच वर्षात कामावरुन कमी केले. त्यामुळे सरकार व कंपनी विरोधात या कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. विविध मागण्यांसाठी 42 दिवसांपासून आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियमवर धरणे आंदोलन करूनही सरकारकडून मागण्यांबाबत तोडगा निघाला नसल्याची भावना संघटनेचे प्रथमेश रामाणे, सागर पारधी, अमित साळवे, प्रतीक्षा ढेरंगे, शामल शेळके, रेश्मा आटोळे, अतुल तोंडे यांनी व्यक्त केली आहे.

डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या मागण्या

  • सर्व डाटा एन्ट्री ऑपरेटर्सचे राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी पद्धतीने समायोजन करावे.
  • यशस्वी कंपनीने कामावरून कमी केलेल्या कर्मचार्‍यांना परत कामावर रुजू करावे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा करार अभंग केल्याप्रकरणी कंपनीवर कारवाई करावी.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत समायोजन करून सर्व प्रकारचे ध्येय व भत्ते लागू करणे.
  • शिकाऊ उमेदवार अधिनियमानुसार दुसर्‍या वर्षाची दहा टक्के वाढ तात्काळ द्यावी आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल कंपनीमार्फत केलेली फसवणूक दूर करावी.
SCROLL FOR NEXT