पुणे

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुण्याचा डंका; राष्ट्रीय पुरस्कारासह फाइव्ह स्टार रेटिंग

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे महापालिकेकडून स्वच्छतेसंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून, 11 जानेवारी रोजी दिल्लीत होणार्‍या कार्यक्रमात हा पुरस्कार महापालिकेला प्रदान केला जाणार आहे. याशिवाय पुणे शहराला स्वच्छतेचे पाच स्टार (फाइव्ह स्टार) रेटिंग मिळाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित केल्या जाणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण 2023 या स्पर्धेत पुणे महापालिकेने सहभाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतेसंदर्भात विविध उपक्रम राबविले जात आहेत. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्राकडून सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये घरोघर कचरा जमा करणे, कचर्‍याचे वर्गीकरण करणे, अशा 24 विविध घटकांचा समावेश होता. या सर्व गोष्टींत महापालिकेने चांगली कामगिरी केल्याने पुणे शहराला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्लीत 11 जानेवारी रोजी होणार्‍या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.

यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातून नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या तीन शहरांनाच निमंत्रित केले आहे. यामध्ये शहराची स्वच्छ सर्वेक्षणमधील रँकिंग देखील कळणार आहे. पुणे महापालिका याआधीच ओपन डिफिकेशन मुक्त झाले आहे. याबाबत महापालिकेने मानांकन देखील मिळवले आहे. मात्र, महापालिका अजून कामगिरीत सुधारणा करीत असून, रँकिंग पहिल्या पाचमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे कदम यांनी सांगितले.

पुणे फाइव्ह स्टार सिटी

पुणे शहराला यापूर्वीच देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून नावलौकिक मिळाला आहे. त्यात अजून एक नावलौकिकाची भर पडली आहे. आजपर्यंत 3 स्टारमध्ये असलेल्या पुण्याला महापालिकेने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पहिल्यांदाच फाइव्ह स्टार होण्याचा मान मिळाला आहे. महापालिका आणि पुणे शहरासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

शहराला स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच पहिल्यांदाच फाइव्ह स्टार प्रमाणपत्र मिळाले आहे. आगामी काळात आपण सेव्हन स्टारसाठी प्रयत्न करणार आहोत. महापालिका आपल्या कामगिरीत अजून चांगल्या सुधारणा करणार आहे. दरम्यान, 11 जानेवारीला दिल्लीला होणार्‍या कार्यक्रमात पुणे शहराला देखील निमंत्रण आहे.

डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धेमध्ये पुण्याला राष्ट्रीय पुरस्कार आणि फाइव्ह स्टार सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे. यात महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांचे मार्गदर्शन, सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे कठोर परिश्रम, आजी-माजी पदाधिकारी आणि पुणेकर नागरिकांचे मोलाचे योगदान आहे.

संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT