पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर धोकादायक दुभाजक; हडपसर परिसरात समस्या

अमृता चौगुले

हडपसर; पुढारी वृत्तसेवा : हडपसर परिसरातील गांधी चौक परिसरातील रस्त्यावर असलेल्या अर्धवट दुभाजकांमुळे वाहनांना अपघात होत आहेत. यामुळे हे दुभाजक तातडीने काढावेत किंवा त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र, दुभाजक अर्धवट स्थिती असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत.

या दुभाजकांमध्ये अनेक व्यावसायिक वाहने उभी करतात तसेच शनिवारी आणि रविवारी दुभाजकांच्या आतच व्यावसायिक दुकाने थाटत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. हे दुभाजक हटवावे किंवा त्यांची दुरुस्ती करावी तसेच या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी सुनील कांबळे व दिलीप गोंधळे यांनी केली आहे.

गांधी चौक परिसरातील रस्त्यावर असलेल्या दुभाजकांबाबत महापालिकेच्या रस्ते विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येईल. हे धोकादायक दुभाजक काढण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल.

               – प्रसाद काटकर, सहायक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय

SCROLL FOR NEXT