खडकवासला : गेल्या दिवसांनंतर खडकवासला धरणक्षेत्रात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर जोरदार वारे वाहत होते. तसेच अधूनमधून ऊन पडत होते. डोंगरमाथ्यावर तुरळक पावसाचा अपवाद वगळता दिवसभर पावसाने पाठ फिरवली होती. सायंकाळी 5 वाजता धरणसाखळीत 5.73 टीएमसी म्हणजे 19.57 टक्के पाणीसाठा झाला होता.
धरण क्षेत्रात सकाळपासून पावसाची नोंद झाली नाही. पावसाने विश्रांती घेतल्याने धरणक्षेत्रातील ओढ्यां-नाल्यांतील पाण्याचे प्रवाहही मंदावले आहेत. त्यामुळे चारही धरणांत पाण्याची आवक जवळपास ठप्प झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणसाखळीत 0.29 टीएमसी अधिक पाणी आहे. गेल्या वर्षी 27 मे 2024 रोजी धरणसाखळीत 5.44 टीएमसी म्हणजे 18.66 टक्के पाणी होते.
धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडला, त्यामुळे धरणसाठ्यात किंचित भर पडली. त्याचा थोडाफार लाभ पुणे शहर व परिसराला झाला आहे. पानशेत व वरसगाव धरणातून खडकवासला धरणात सध्या पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. पानशेत धरणामध्ये सध्या 18.12 टक्के, वरसगावमध्ये 21.45 टक्के, टेमघरमध्ये 4.10 टक्के आणि खडकवासला धरणात 45.72 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी दिली.