बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत देवकातेनगर येथे महिलेचे हात-पाय बांधत तिला मारहाण करून 1 कोटी 7 लाखांचा दरोडा टाकल्याप्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या सहा जणांपैकी एक जण ज्योतिषी आहे. त्याने या दरोड्याचा मुहूर्त काढून दिला होता. लुटीनंतर त्याला 8 लाख रुपयांची दक्षिणा मिळाल्याची माहिती तपासात समोर आली. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनीच ही माहिती दिली. बारामतीत 21 एप्रिल रोजी पडलेला दरोडा पोलिसांना चक्रावून टाकणारा होता. याप्रकरणी पोलिसांनी सचिन अशोक जगधने (वय 30, रा. गुणवडी, 29 फाटा, ता. बारामती), रायबा तानाजी चव्हाण (वय 32, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), रवींद्र शिवाजी भोसले (वय 27, रा. निरावागज, बारामती), दुर्योधन ऊर्फ दीपक ऊर्फ पप्पू धनाजी जाधव (वय 35, रा. जिंती हायस्कूलजवळ, ता. फलटण, जि. सातारा), नितीन अर्जुन मोरे (वय 36, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह रामचंद्र वामन चव्हाण (वय 43, मूळ रा. आंदरुड, ता. फलटण, जि. सातारा; सध्या रा. वडूज, ता. खटाव, जि. सातारा) या सहा जणांना अटक केली. यातील रामचंद्र चव्हाण हा ज्योतिषी आहे. त्यानेच या दरोड्याचा मुहूर्त काढून दिला होता.
सागर गोफणे हे तिरुपतीला दर्शनाला गेल्यानंतर त्यांची पत्नी व दोन मुले घरी असल्याचे पाहून हा दरोडा टाकण्यात आला. ते बाहेरच्या राज्यात दर्शनाला गेल्याची टीप आरोपींना कोणी दिली, याचा अद्याप तपास लागलेला नाही. परंतु, 95 लाख रुपयांची रोख रक्कम लुटल्यानंतर मुहूर्त पाहणार्या चव्हाण याला त्यातील 8 लाख रुपये दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात जवळपास 61 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. 20 तोळ्यांचे दागिनेही जसेच्या जसे मिळाले आहेत.
बुटावरून लागला छडा
दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार नाहीत. त्यामुळे दरोडा टाकल्यानंतर पोलिस आपल्यापर्यंत पोहचले नाहीत, यामुळे ते खूश होते. सुमारे तीन महिने पोलिसांना कसलाच सुगावा लागत नव्हता. दरोड्यातील रक्कम मोठी असल्याने तपासाचे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर परिसराची पाहणी करताना त्यांना एक बूट मिळून आला. या बुटावरून दरोड्याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. हा बूट कुठे वापरला जातो, याची माहिती पोलिसांनी घेतली. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीत कामगार अशा पद्धतीचे बूट वापरतात, एवढीच त्रोटक माहिती सुरुवातीला हाती लागली. परंतु, त्यातून आशेचा एक किरण निर्माण झाला. तेथील कामगारांची गुप्तपणे चौकशी सुरू झाली. त्यात काही मजुरांबाबत संशय निर्माण झाला. त्यातून या मोठ्या दरोड्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले.