पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'आरोग्य यंत्रणेला 108 या रुग्णवाहिका सेवेमुळे खूप मोठा हातभार लागला आहे. यामध्ये 'बीव्हीजी'चे खूप मोठे योगदान आहे. दैनिक 'पुढारी'ने जपलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे,' अशा भावना राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. 'पुढारी रिलीफ फाउंडेशन'तर्फे 'एमईएमएस 108' या सेवेसाठी बीव्हीजी कंपनीला अत्याधुनिक साधनसामग्रीने सुसज्ज असलेली कार्डिअॅक रुग्णवाहिका हस्तांतरित करण्यात आली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि 'पुढारी'चे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. 'सेवार्थ क्रिटिकेअर सर्व्हिसेस प्रा. लि.' यांच्याकडून रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे. या वेळी 'बीव्हीजी'तर्फे फ्लीट मॅनेजर संजय चौधरी, झोनल मॅनेजर विठ्ठल बोडखे, डिस्ट्रिक्ट मॅनेजर डॉ. प्रियांक जावळे, सहाय्यक डिस्ट्रिक्ट मॅनेजर सुजित पाटील आणि नानासाहेब ओव्हाळ, डॉ. संदीप शिंदे, इमर्जन्सी असिस्टंट राम जाखडे, पायलट पुरुषोत्तम दडमल, असिस्टंट सेल्स मॅनेजर महेश घाडगे, सप्लाय चेन मॅनेजर अविनाश जाधव आदी होते.