पुणे

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिला फुटबॉल स्पर्धा; पुणेरी वॉरियर्स, अस्पायर संघ अंतिम फेरीत

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' आयोजित 'राईज अप' महिलांच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये पुणेरी वॉरियर्स आणि अस्पायर फुटबॉल क्लब संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. दै. 'पुढारी'च्या वतीने या स्पर्धा महाराष्ट्रीय मंडळाच्या मुकुंदनगर येथील फुटबॉल मैदानावर सुरू आहेत.

या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये पुणेरी वॉरियर्स संघाने क्रीडा प्रबोधिनी संघाचा 1-0 असा पराभव करीत दणदणीत विजय मिळविला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. परंतु पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. परंतु, दुसर्‍या सत्रामध्ये दोन्ही संघातील खेळाडूंनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर पुणेरी वॉरियर्सच्या निलिशा संकेत हिने 38 व्या मिनिटाला गोल नोंदवित संघाला विजय मिळवून दिला.

दुसर्‍या सामन्यामध्ये अस्पायर फुटबॉल क्लब संघाने पुणे सॉकर क्लब संघाचा 1-0 असा एकतर्फी पराभव करीत दणदणीत विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यामध्ये दोन्ही संघांचा खेळ उत्कृष्ट झाला. दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये ऊर्जा दिसून आली.
या सामन्यामध्ये अस्पायर संघाच्या तनया गायकवाड हिने पेनल्टी कॉर्नरवर 28 व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवित संघाला विजय मिळवून दिला. रविवारी (दि. 20) सकाळी 9 वाजता पुणे सॉकर क्लब आणि क्रीडा प्रबोधिनी यांच्यामध्ये तृतीय स्थानासाठी लढत होणार असून अस्पायर फुटबॉल क्लब आणि पुणेरी वॉरियर्स यांच्यातील अंतिम लढत लागणार आहे.

SCROLL FOR NEXT