पुणे

‘दादा तुम्ही एकदम खरं बोललात बघा!’ सभेतील ‘त्या’ वाक्यावरून पारगावमध्ये चर्चा

अमृता चौगुले

नानगाव; पुढारी वृत्तसेवा: एका कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या काढत सल्ला दिला. ते म्हणाले, गाव बरोबर नाही आणि वरवर नेतेपण करू नका, असा शब्द वापरताच उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि या एका वाक्याने पारगावमध्ये चर्चेला बांध फुटला. 'दादा, तुम्ही एकदम खरं बोललात बघा', अशी एकच चर्चा आता सुरू झाली आहे.

याला कारणही तसेच आहे. पारगाव येथे महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या दोन संस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात समर्थकांच्या हातामधून गेल्या. आमदार राहुल कुल समर्थकांनी येथे एकहाती सत्ता स्थापन करत राष्ट्रवादीला चांगलाच धक्का दिला आहे. मागील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात समर्थक पॅनेल विरुद्ध भाजपचे आमदार राहुल कुल समर्थक पॅनेल अशी समोरासमोर लढत झाली. या लढतीत आमदार कुल समर्थक पॅनेलने थोरात समर्थक पॅनेलचा धुव्वा उडवत अनेक वर्षांच्या सत्तेला खाली खेचले आणि ग्रामपंचायतीवर आमदार राहुल कुल समर्थकांनी झेंडा फडकविला.

त्यानंतर गावातील महत्त्वाच्या व मोठ्या विकास सेवा सोसायटीची नुकतीच निवडणूक झाली. या संस्थेतदेखील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात समर्थकांची एकहाती सत्ता होती. मात्र मागील निवडणुकीत देखील भाजपचे आमदार राहुल कुल समर्थक पॅनेलने अनेक वर्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक पॅनेलचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता स्थापन करत गावातील महत्त्वाची दुसरी संस्था ताब्यात घेत आपले वर्चस्व सिद्ध केले.

सध्या पारगाव सा.मा. येथे महत्त्वाच्या ग्रामपंचायत आणि सोसायटीवर भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकांमध्येदेखील याच गटाचा वरचष्मा राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पारगाव येथील सभेत अजित पवार बोलले आणि बरोबर अशीच परिस्थिती येथे असल्याने नागरिक याच वाक्याची चर्चा करताना दिसत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT