भोर; पुढारी वृत्तसेवा : सायबर गुन्हेगारी विस्तारत आहे. दररोज सायबर गुन्ह्यांमध्ये भर पडत आहे. फसलेल्या लोकांची आर्थिक लुबाडणूक तसेच चारित्र्यहनन होत असून, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. सहयोगी संस्थांच्या सहकार्याने भोर तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले. राजगड ज्ञानपीठाच्या फार्मसी हॉलमध्ये भोर तालुका पत्रकार संघ, पुणे ग्रामीण पोलिस व राजगड ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, सचिन पाटील, सचिन कांडगे आदी उपस्थित होते.
दुसर्या सत्रात सायबर सुरक्षा म्हणजे काय आणि कशी खबरदारी घ्यावी, यावर सचिन कांडगे (सहायक पोलिस निरीक्षक सायबर विभाग), योगेश ठाणगे (सायबर गुन्हेतज्ज्ञ) यांनी मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील म्हणाले की, सायबर सुरक्षा कार्यशाळेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन त्यांनी केले.प्रास्ताविक भुजंगराव दाभाडे यांनी केले. स्वागत विजय जाधव यांनी केले. कार्यशाळेची भूमिका प्रसन्नकुमार देशमुख यांनी मांडली. सूत्रसंचालन प्रा. संजय देवकर यांनी केले. किरण भदे यांनी आभार मानले.