Fake Kidnapping Case Pudhari
पुणे

Pune Cyber Fraud Fake Kidnapping Case: बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा गैरफायदा; सायबर चोरट्यांकडून वडिलांची फसवणूक, १७ तासांत मुलगी सुरक्षित

व्हॉट्सअ‍ॅप पोस्टरचा वापर करून बनावट अपहरण व्हिडिओद्वारे १५ हजारांची खंडणी उकळली; कोंढवा पोलिसांनी झारखंडमधून मुलीचा शोध घेतला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी तिच्या वडिलांकडून १५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, कोंढवा पोलिसांनी अवघ्या १७ तासांत मुलीचा शोध घेत तिला झारखंडमधून सुखरूप ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी कोंढवा पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. फिर्यादी हे मूळचे बिहार येथील असून, कुटुंबासह काकडे वस्ती, कोंढवा येथे वास्तव्यास आहेत. त्यांची १७ वर्षीय मुलगीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला होता.

तक्रार दाखल होताच कोंढवा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुलीचा शोध सुरू केला. याच दरम्यान फिर्यादींच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला व ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे,' अशी धमकी देत ५० हजार रुपयांची मागणी करत त्याने मोबाईलवर पैसे पाठविण्यासाठी स्कॅनरही पाठवला.

व्हिडिओ कॉलमध्ये मुलीचे हात-पाय बांधलेले असल्याचे दाखवले होते. त्यामुळे घाबरलेल्या वडिलांनी तीन टप्प्यात प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये संबंधित खात्यावर पाठविले. दरम्यान, पाेलिसांनी सायबर चाेरट्याला मुलगी सापडली असून, आजी जवळ असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतरही सायबर चाेरटा फिर्यादींकडे बक्षीस म्हणून पैसे मागत हाेता.

दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत पुणे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्या वेळी संबंधित मुलगी हावडा (कोलकाता)कडे जाणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये बसल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून गाडीची माहिती घेण्यात आली. रेल्वे टाटानगर (जमशेदपूर, झारखंड) येथे पोहोचणार असल्याचे समजताच तेथील रेल्वे पोलिस आणि टीसी यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

टाटानगर येथे रेल्वे पोलिसांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर कोंढवा पोलिसांचे पथक आणि फिर्यादी यांना झारखंडला रवाना करण्यात आले.

मुलीला ताब्यात घेऊन तिला पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रकरणी बनावट अपहरणाचा व्हिडिओ कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे व त्यांच्या पथकाने केली.

व्हॉट्सअ‍ॅप पोस्टरचा घेतला गैरफायदा

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध लागावा यासाठी वडिलांनी मुलीचा फोटो आणि माहिती असलेले पोस्टर तयार करून विविध व्हॉट्सअ‍ॅप समूहांवर प्रसारित केले होते. ही माहिती सायबर चोरट्यांच्या हाती लागली. त्याचाच गैरफायदा घेत त्यांनी बनावट अपहरणाचा व्हिडिओ तयार करून मुलगी त्यांच्या ताब्यात असल्याचे भासविले आणि भीती दाखवून १५ हजार रुपयांची खंडणी उकळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT