पुणे

पुणे : गुन्हेगारीला लगाम, हीच खरी परीक्षा! नवे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना कारवायांमध्ये ठेवावे लागणार सातत्य

अमृता चौगुले

महेंद्र कांबळे
पुणे : वाढत्या शहराबरोबर गुन्हेगारीला चाप लावण्याचे काम तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेच. सव्वादोन वर्षांत मोक्काचे शतक पार केल्याने गुन्हेगारीवर बर्‍याच प्रमाणावर वचक बसला. आता नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्यासमोर पुण्यासारख्या 'हाय क्राइम रेट' असणार्‍या शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. पदभार घेताच त्यांनी शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यासमोर आता गुन्हेगारीविरोधातील कारवायांमध्ये सातत्य ठेवण्याचे आव्हान आहे.

सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे हब असलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारी कारवायांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. घरफोड्या, जबरी चोर्‍या, स्ट्रीट क्राइमचे गुन्हे डोके वर काढत आहेत. आगामी काळात महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय परिस्थिती समजून घेऊन नव्याने रुजू झालेल्या शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना कायदा आणि सुव्यवस्था हाताळावी लागणार आहे.

अमिताभ गुप्ता यांनी काय काय केले..?
114 मोक्काच्या कारवायांत 500 हून अधिक गुन्हेगार जेरबंद
80 हून अधिक गुन्हेगारांना एमपीडीएमार्फत कारागृहाची हवा
सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई
कोंबिंग ऑपरेशनद्वारे गुन्हेगारांवर वचक
रस्त्यावरील वाढदिवस, 'आफ्टर-बिफोर'ची कारवाई
अमली पदार्थ, गुटखा तस्कर जेरबंद
क्रिकेट बेटिंग करणार्‍यांचे मनसुबे उधळले
टीईटी, म्हाडा, आरोग्य भरती घोटाळा उघड
सावकारी, खंडणीखोरी करणार्‍यांवर कडक कारवाई
प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबरच्या गुन्ह्याचा तपास
पोलिस दलाची प्रतिमा उंचाविण्याचे काम

सायबर गुन्हेगारीचे आव्हान
सायबर गुन्हेगारी हे पोलिस दलासमोरील मोठे आव्हान असून, सातत्याने सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. सेक्सटॉर्शन, लोन अ‍ॅपच्या माध्यमातून होणारी लूट, बिटकॉइनच्या माध्यमातून होणारी फसवणूक, अशा गुन्ह्यांकडे विशेष लक्ष देऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.

कोंडीवर द्यावे लागणार लक्ष
शहरातील वाहतूक कोंडी हा पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडविताना माजी आयुक्तांना अप्रत्यक्षपणे टीकेला सामोरे जावे लागले होते. तरीही विविध उपाययोजना राबवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. परंतु, वाहतूक कोंडीवर अजूनही मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. त्यावरही नव्या पोलिस आयुक्तांना लक्ष द्यावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT