पुणे

ओढ्यांवरील कल्व्हर्टची कामे अपूर्णच : अडचणींमुळे कामास विलंब; प्रशासनाचे मत

Laxman Dhenge

पुणे : शहरातील आंबिल ओढ्यासह इतर ओढ्यांवरील कल्व्हर्ट (पूल) बांधण्याची महापालिकेने हाती घेतलेली कामे कासवगतीने सुरू असून, संबंधित ठेकेदारांना वर्कऑर्डर देऊन चार वर्षे झाली तरीही कामे पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, कामांमध्ये विविध प्रकारच्या अडचणी येत असल्याने विलंब होत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. शहराच्या पश्चिम भागात 25 सप्टेंबर 2019 रोजी आंबिल ओढ्यासह लहान-मोठ्या ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला होता. रात्रीच्या वेळी आंबिल ओढ्याने रौद्ररूप धारण केल्याने ओढ्याच्या परिसरातील कात्रज तलाव, बालाजीनगर, इंदिरानगर, के. के. मार्केट, अरण्येश्वर, पद्मावती, पर्वती, बागूल उद्यान, मित्रमंडळ चौक, लक्ष्मीनगर, दांडेकर पूल परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते.

या महाकाय संकटात काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले, वाहनांचे नुकसान झाले, अनेक वाहने वाहून गेली. पुराचा फटका हिंगणे, वडगाव, आनंदनगर परिसरातील नागरिकांनाही सहन करावा लागला होता. या घटनेनंतर महापालिकेने एका संस्थेमार्फत आंबिल ओढ्याच्या उगमापासून नदीपर्यंत सर्व्हे केला होता. या सर्व्हेच्या माध्यमातून महापुरामध्ये 280 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर, पुन्हा पुराचा धोका टाळण्यासाठी ओढ्यांच्या प्रवाहामधील अतिक्रमणे दूर करणे, ओढ्यांना सीमाभिंती बांधणे, कल्व्हर्टची उंची वाढविणे आदी उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाने ओढ्याच्या परिसरातील रस्ते, कल्व्हर्ट, ड्रोनेजलाइन आदींच्या कामासाठी 77 कोटींची तरतूद केली होती.

तसेच तातडीची कामे त्वरित करण्याचा निर्णय घेतला होता. या अनुषंगाने गुजरवाडी ते मित्रमंडळ चौक यादरम्यान आंबिल ओढ्यावर आणि हिंगणे, वडगाव, आनंदनगर परिसरातील ओढ्यांवर 21 कल्व्हर्ट बांधण्याच्या निविदा काढण्यात आल्या. या कामासाठी संबंधित दोन ठेकेदारांना फेब्रुवारी 2020 मध्ये वर्कऑर्डर दिल्या. एका वर्षात कामे पूर्ण करण्याची अट निविदेत होती. मात्र, ही कामे कासवगतीने सुरू असल्याने चार वर्षांनंतरही ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. हाती घेतलेल्या 21 पैकी आत्तापर्यंत 16 कल्व्हर्टची कामे पूर्ण झाली असून, चार कल्व्हर्टची कामे अद्याप सुरूही झाली नाहीत, तर एका कल्व्हर्टचे कामे अर्धवट आहे.

येथील कामे झाली पूर्ण

अरण्येश्वर मंदिर, खोपडेनगर, म्हसोबा मंदिर-सुखसागरनगर, वाघजाईनगर, महादेवनगर 1, महादेवनगर 2, महादेवनगर 3, आनंद विहार कॉलनी, वडगाव पोलिस चौकी, पद्मजा सोसायटी, लेकटाऊन, राजस सोसायटी, जयशंकर गल्ली-तावरे कॉलनी, दांडेकर पूल-पेट्रोल पंपाजवळ, विठ्ठलवाडी स्मशानभूमी, संतोष हॉल.

काम अर्धवट असलेले कल्व्हर्ट

  • मित्रमंडळ चौक (आंबिल ओढा)
  • काम सुरू न झालेले कल्व्हर्ट
  • ट्रेझर पार्क – आंबिल ओढा
    (खासगी सोसायटीची जागा ताब्यात येत नाही.)
  • सुविधा ज्ञानगंगा सोसाटी – हिंगणे बेसिन
    (कामासाठी वाहतूक पोलिस ना हरकत प्रमाणपत्र देत नाहीत.)
  • निंबजनगर-हिंगणे बेसिन
    (खासगी जागामालक जागा देत नाही.)

फरसी पूल-दत्तवाडी (एमएसईबीची 132 केव्हीची केबल आहे, ती स्थलांतरित केली जात नाहीत.) ओढ्यांवर कल्व्हर्टची कामे बर्‍यापैकी पूर्ण झालेली आहेत. काम करताना ठेकेदाराला विविध अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.

– साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, महापालिका

हेही वाचा

SCROLL FOR NEXT