सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात शेती मशागतीला वेग आला आहे. उन्हाचा वाढता कडाका डोकेदुखी ठरत असल्याने शेतकरी सकाळी आणि सायंकाळी शेतातील कामे करताना दिसत आहेत. पुढील दोन महिने प्रचंड उन्हाची धास्ती शेतकर्यांना लागली आहे. शेतातील पिकांची काढणी-मळणी पूर्ण झाल्याने शेतकरी शेताची मशागत उरकून घेत आहेत.
गाळप हंगाम बंद झाल्याने ऊसाच्या शेतीची मशागत करणे सध्या सुरू आहे. उसाचे पाचट कुजवण्याकडेही शेतकर्यांचा कल वाढताना दिसत आहे. ट्रॅक्टरचालक नागंरणीसाठी प्रतिएकर 3 ते साडेतीन हजार, काकरणीसाठी 2 हजार, रोटावेटर मारण्यासाठी 2200 रुपये तसेच पेरणी आणि सरीसाठी प्रतिएकर 2 हजार असे कमी-अधिक प्रमाणात दर आकारत आहेत.
नांगरणे, काकर मारणे, रोटावेटर मारणे, पाचटकुट्टी, शेणखत झाल्यानंतर घालणे, उसाची बांधणी आदी कामे यांत्रिकीकरण, बैलगाडी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुरू आहेत. तालुक्यातील गहू आणि हरभरा काढणी व मळणी जवळपास पूर्ण झाली आहे. तरकारी पिकांबरोबरच सध्या जनावरांच्या चार्याची पिके जोमदार आली आहेत.
वाढती महागाई, डिझेलच्या वाढत्या किमती, धान्याचे घसरलेले दर, खतांच्या वाढलेल्या किमती, मातीमोल किमतीने विकल्या जाणार्या पालेभाज्या यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. मात्र, शेती मशागतीचे दर काही वर्षांपासून टिकून असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. उन्हामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्न सतावणार असल्याची स्थिती बारामती तालुक्यात पहायला मिळत आहे.