पुणे: विकेंडमुळे कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात शनिवारी (दि.28) पर्यटकांची गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यातील विविध जिल्ह्यांतील, गावांतील शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीदेखील प्राणिसंग्रहालय येथे आल्या होत्या. त्यामुळे शनिवारी शालेय विद्यार्थ्यांचीही गर्दी प्राणिसंग्रहालयात मोठ्या प्रमाणात दिसली.
अलीकडील काळात राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. डिसेंबर महिन्यात शिल्लक कार्यालयीन सुट्या मिळाल्यामुळे अनेक पर्यटक पर्यटनावर भर देत असतात. त्यामुळे राजीव गांधी प्राणिसंग्रहालयासह शहरातील विविध पर्यटन स्थळांवर फिरण्यासाठी येणार्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे. वाघ, सिंह, हत्ती, साप यांसारखे प्राणी पाहण्याची चिमुकल्यांना खूपच उत्सुकता असते. त्यामुळे कुटुंबीयांसह अनेक चिमुकले प्राणिसंग्रहालयात पाहायला मिळाले.
परदेशी पर्यटनालाही पसंती
पुणे परिसरातील किल्ले, बागा, प्रसिद्ध मंदिरे, वाडे पाहाण्यासाठी पुणेकर विकेंडला घराबाहेर पडत आहेत. यामुळे पर्यटनासाठी गर्दी होत आहे. तसेच, राज्यातील पर्यटनस्थळांसह परदेशी पर्यटनस्थळे पाहायलादेखील पसंती वाढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये वाढ होत असल्याचे चित्रदेखील पाहायला मिळत आहे.
शालेय विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध पर्यटन
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात एसटी बसच्या माध्यमातून शनिवारी सोलापूर, अकलूजसह विविध शहरांतील शालेय सहलींनी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. शालेय सहली घेऊन आलेले शिक्षक मुलांना एका रांगेत, शिस्तबध्दरीत्या प्राणिसंग्रहालयात विद्यार्थ्यांना घेऊन जाताना दिसले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्सुकतेने प्राणिसंग्रहालयातील प्राणी शनिवारी पाहिले.