नवी सांगवी (पुणे) : पिंपळे गुरव येथील महापालिकेचे डायनासोर गार्डन म्हणजेच राजमाता जिजाऊ उद्यान येथे सलग दोन दिवस बालचमू आणि नागरिकांची दिवसभर अलोट गर्दी उसळली होती. रविवार, सोमवार जोडून सुटी आल्याने कुटुंबीयांसमवेत येथील उद्यानात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे उद्यानाच्या बाहेर खेळणी, फुगे, खाद्यपदार्थ व शीतपेय विक्रेत्यांची चांदी झाली होती.
येथील उद्यानात प्रवेश करण्यासाठी रविवारी दिवसभर तिकीट विक्री खिडकीजवळ नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारच्या सुमारास उन डोक्यावर येत असूनही रांगेत उभे राहून तिकीट काढून उद्यानात प्रवेश करण्यासाठी गर्दी करीत होते. दुबईच्या व्हर्टीकल गार्डनच्या धर्तीवर महापालिकेने येथील उद्यान विकसित केले आहे. सिंगापूरच्या धर्तीवर रात्रीच्या अंधारात सुपर ट्री वरील रंगीबेरंगी विद्युत प्रकाश झोत नागरिकांना आकर्षति करीत आहेत. अनेकजण फोटो, सेल्फी काढताना पाहवयास मिळत आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक वर रिल्स, उद्यानातील फोटो पाहून पिंपरी चिंचवड शहारातूनच नव्हे, तर पुणे व परगावाहूनदेखील नागरिक हे उद्यान पाहण्यासाठी येथे सुटीच्या दिवशी येत असल्याचे दिसून आले.
मनमोहक अशी झाडे, फुले, वेलींनी बहरलेल्या उद्यानात हिरवळीचे मैदान, फ्लावर बेड, प्रवेशद्वार, धावणे मार्ग, खेळाचे साहित्य सामग्री, कारंजी, बुध्दीबळ मैदान, एलईडी विद्युत रोशनाई, मुलांसाठी खेळायला व बसायचे मैदान, स्वच्छतागृह आदी सौयीसुविधांयुक्त वसलेल्या येथील उद्यानाचा गवगवा होताना पहावयास मिळाले. मोकळा श्वास, शुद्ध हवा, ऑक्सिजन मिळत असल्याने पहाटेच्या सुमारास नियमित व शारीरिक व्यायाम तसेच फेरफटका मारणार्या नागरिकांची गर्दी होत आहे.
उद्यानात प्रवेश करण्यासाठी प्रौढांसाठी 20 रुपये तर लहान मुलांसाठी 10 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत लाखांहून अधिक रकमेची भर पडून आतापर्यंत दोन दिवसांत नागरिकांच्या गर्दीने तिजोरीचा उच्चांक गाठला आहे. एवढेच नव्हे, तर येथील खाद्यपदार्थ विक्रेते, शीतपेय विक्रेते, विविध खेळणी विक्रेते यांची तर गेल्या दोन दिवसांत चांदीच झाली आहे. नेहमीपेक्षा दुप्पट फायदा झाल्याचे येथील विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
आम्ही दोघींनी येथील उद्यानाबाबत ऐकले होते. खूप काही पाहण्यासारखे असून येथील उद्यानातील बहरलेली झाडे, पाने, फुले पाहण्यासाठी आलो आहोत.
– कोमल जाधव, चिंचवडकुटुंबातील सर्वांना घेऊन आलो आहे. विशेष म्हणजे मुलांना येथील डायनासोर पाहण्यासाठी आणले आहे. प्रथमच येथील उद्यानातील स्ट्रीट लाईट पाहणार आहे.
– डॉ. मुदस्सार खान, येरवडादिवसेंदिवस सुटीच्या दिवशी गर्दी वाढत आहे. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी वेळ जात आहे. एखादी खिडकी वाढविण्यात यावी. म्हणजे नागरिकांचा वेळ वाचेल.
– दिलीप कांबळे, पिंपळे गुरवनागरिकांनी जास्तीत जास्त येथील उद्यानाला भेट द्यावी. जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी यापुढे आमचा प्रयत्न असणार आहे. मात्र, स्मार्ट उद्यान जसे आहे तसे नागरिकांनी स्मार्ट व्हावे. उद्यानाला इजा होऊ देऊ नये.
– रविकिरण घोडके, उद्यान प्रमुख