पुणे

तळेगावातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

अमृता चौगुले

तळेगाव स्टेशन : तळेगाव स्टेशन भागात भोगी आणि मकर संक्रांतीच्या सणासाठी लागणार्‍या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. परिसरातील स्वराजनगरी, यशवंतनगर, वतननगर, मनोहरनगर येथे दुकाने थाटण्यात आली आहेत. खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग दिसून आली. संक्रांती सणासाठी लागणारे खण (छोटी गाडगी), कोवळ्या ज्वारीची कणसे, गव्हाच्या ओंब्या, बोरे, हरभरा (डहाळा), भुईमुगाच्या शेंगा, ऊस, तिळगूळ आदी वस्तू विक्रीसाठी बाजारात होत्या.

काळ्या रंगाच्या साड्या खरेदीची महिलांची लगबग
उपनगरांतील कोपर्‍या कोपर्‍यांवरही अनेकांनी अशा वस्तू विकण्यासाठी ठेवल्या आहेत. वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. संक्रांतीसाठी खणही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. तसेच, संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीसाठी मिक्स भाजी करण्यात येत असल्यामुळे भाजी मंडईत नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली. वांगी, वटाणा, पावटा, घेवडा, बटाटा आदींचे भाव वाढले दिसून आले. कपड्यांच्या दुकानात साड्या खरेदीसाठी ही महिलांनी गर्दी केली होती. काळ्या रंगांच्या साड्या खरेदीकडे महिलांची पसंती दिसून आली.

SCROLL FOR NEXT