पुणे

नागरिक, विद्यार्थ्यांसाठी रस्ता ओलांडणे ठरतेय जीवघेणी कसरत; पादचारी भुयारी मार्गाची गरज

संकेत लिमकर

[author title="शिवाजी शिंदे" image="http://"][/author]

पुणे : मुंढवा येथील महात्मा फुले चौकातील रस्ता ओलांडणे अत्यंत धोकादायक झाले आहे. सिग्नल सुटल्यानंतर सुसाट वेगाने धावणार्‍या वाहनांसमोर येथील शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठी तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागत आहे. याच चौकात रस्ता ओलांडताना अनेक अपघातही झालेे आहेत. काहींना तर आपला जीव गमवावा लागला आहे. विद्यार्थ्यांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

वर्षानुवर्ष तेच ते!

मुंढवा, केशवनगर हा परिसर गेल्या दहा-बारा वर्षांपासूनच गजबजलेला आहे. हडपसर-खराडी बायपास हायवे रस्ता झाल्याने या मार्गांवरून हडपसरकडे व नगरकडे जाणार्‍या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मगरपट्टा, अमनोरा, खराडी या परिसरात आय.टी.पार्क झाल्याने कर्मचार्‍यांची वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर वाढली. दुचाकी, चारचाकी, जड वाहने यांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले. अक्षरशः रस्ताही अपुरा पडू लागला. महात्मा फुले चौकात सिग्नल उभा राहिला. त्यानंतर बीडकरवस्ती ते बधेवस्ती मुख्य रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले. रस्ता मोठा होत गेला तशी वाहतूकही वाढली.

मुंढवा परिसरात लोणकर विद्यालय व राजर्षी शाहू महाराज ही दोन मोठी विद्यालये आहेत. या दोन्ही विद्यालयात केशवनगर, घावटेनगर, मांजरी, फलाटवस्ती अशा अनेक परिसरांतून दररोज हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. काही मुले पालकांबरोबर, काही सायकलवर, तर काही पायी येतात. यात मुंढवा-केशवनगर जोडणारा रस्ता म्हणजे महात्मा फुले चौक. हा चौक पार करणे जिकिरीचे होत आहे. जीव मुठीत धरूनच तारेवरची कसरत करत हा चौक ओलांडावा लागत आहे. यात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना धोका पत्करावा लागत आहे.

वाहतूक कमी करण्यासाठी या चौकाजवळ असलेली अतिक्रमणे महापालिकेने काढली. रस्ता रुंद केला. मात्र, वाढत्या वाहनांमुळे या चौकात पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती पाहावयास मिळत आहे. या चौकातील वाहतुकीची कोंडी सोडवायची असेल, तर पादचारी भुयारी मार्ग करण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी वर्तविले आहे.

काय उपाययोजना करता येतील?

  • वाहतूक विभागाचे वॉर्डन विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करू शकतील.
  • महात्मा फुले चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नव्याने रंगवून वाहनचालकांकडून त्याचे काटेकोरपणे पालन करण्यास भाग पाडणे.
  • वाहनचालकांनी येथील चौकात आपल्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे व सिग्नलचे काटेकोरपणे पालन करणे.
  • येथील चौकात लहान मुले, वयोवृद्ध, महिला यांना रस्ता ओलांडण्यासाठी लोखंडी जिना तयार करता येईल. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर शिस्तीने चालणे गरजेचे आहे.
  • मित्र-मैत्रिणींच्या हाताला धरून एकत्रितपणे रस्ता ओलांडावा. येथील चौकात वेगावर नियंत्रण करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे स्पीड ब्रेकरता येतील. रस्ता ओलांडण्याकरिता पादचार्‍यांसाठी भुयारी मार्ग केला,तर अनेक धोके टाळले जातील.

काय म्हणतात स्थानिक नागरिक ?

सिग्नल लागला तरी आपली वाहने पुढे-पुढे नेण्याचीच जणू स्पर्धा लागते. सिग्नल सुटल्यानंतर तर जशी गाड्यांची रेस सुरू होते. त्याप्रमाणे वाहनचालक आपली वाहने हाकतात. त्यात एखादा पादचारी अडकला तर त्याचे काही खरं नाही. अशावेळी प्रसंगावधान राखून आपला जीव वाचविण्याशिवाय पर्यायच राहत नाही.

– सोमनाथ गायकवाड, स्थानिक नागरिक

महात्मा फुले चौकात अनेक अपघात झाले आहेत. यासाठी महानगरपालिकेने येथील चौकात
पादचार्‍यांसाठी भुयारी मार्ग करावेत तसेच विद्यार्थ्यांसाठी वॉर्डन नेमणे गरजेचे आहे. वाहतूक विभागानेही नियम तोडणार्‍यांवर कडक कारवाई करावी.

– जितीन कांबळे, स्थानिक नागरिक

महात्मा फुले चौक फार धोकादायक झाला आहे. येथील चौकात गरजेनुसार पादचार्‍यांसाठी भुयारी मार्ग, जिना उभारण्यात यावा. पादचार्‍यांसाठी उपाययोजना कराव्यात. शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी सध्या तरी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.

– देवेंद्र भाट, स्थानिक नागरिक

वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे अतिशय अवघड झाले आहे. या कोंडीतून नागरिक आणि विद्यार्थी यांची सुटका करावयाची असेल, तर भुयारी मार्ग लवकरात लवकर करणे गरजेचे आहे.

– पंकज कोद्रे, स्थानिक नागरिक

SCROLL FOR NEXT