पुणे: शहराच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी कचर्याचे ढीग तसेच दिसत आहेत. एवढा पैसा नेमका जातो कुठे? आणि खरंच एवढ्या खर्चाची गरज आहे का? अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करत येत्या आठ दिवसांत घनकचरा व्यवस्थापनाविषयी अनेक बदल करण्यात येईल, असा विश्वास महानगर पालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी व्यक्त केला.
महानगर पालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवलकिशोर राम यांनी शहरातील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अचानक भेटी सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 8) सकाळी त्यांनी वारजे परिसरात पाहणी केली. (Latest Pune News)
यावेळी रस्त्याच्या कडेला आठ-दहा दिवसांपासून साचून राहिलेला कचरा पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच थेट संबंधित स्थानिक अधिकारी व कर्मचार्यांना फोन करून घटनास्थळी बोलावले. कर्मचार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर राम यांनी स्वतःच त्या कचर्याचे निरीक्षण करत अधिकार्यांची व कर्मचार्यांची कानउघडणी केली. नंतर अधिकारी व कर्मचार्यांची तारांबळ उडाली. त्यांनी तातडीने कचरा उचलला.
या बाबत पत्रकारांना माहिती देताना राम म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनात अनेक त्रुटी आहेत. कोट्यवधी रुपये खर्चूनही शहर जर अस्वच्छ राहात असेल तर अशा खर्चाचा उपयोग काय? घराघरांतून कचरा गोळा करणार्या संस्थेबाबत तक्रारी आहेत.
प्रत्यक्षात 4 हजार कर्मचारी स्वच्छतेची कामे खरंच करतात का? याची तपासणी केली जाईल. त्यांच्या बँक खात्यांचीही माहिती घेतली जाईल. झाडणकाम करणारे कर्मचारी रस्त्यावर दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, अशी कबुलीदेखील आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
ते म्हणाले, कचरा वेळेत उचलण्यासाठी घनकचरा विभाग आणि वाहतूक विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. शहर स्वच्छतेसाठी नव्या नियोजनाची रूपरेषा अंतिम टप्प्यात असून, येत्या आठ दिवसांत त्याची अंमलबजावणी केली जाईल. शहराच्या कचरा व्यवस्थापन पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणले जातील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.