पुणे

पुणे : वीजपुरवठा बंद केल्याने पिके जळू लागली ; शिरूरच्या पूर्वभागातील शेतकरी संतप्त

अमृता चौगुले

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : 'शेतमालाला बाजारभाव नाही… प्रतिकूल परिस्थितीत पीक जगवलं… मात्र पुन्हा एकदा महावितरणची वीजबिल वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याची घाई… कोणतंही सरकार आलं तरी शेतकर्‍यांना दिलासा मात्र काहीच नाय… मग काय उपयोग…?' अशी संतप्त प्रतिक्रिया शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी व्यक्त करत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे पिकांना वेळीच पाणी देणे गरजेचे असते. मात्र, आता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने पिकांना पाणी देता येत नाही, त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची पिके ऐन दाणे भरणीच्या काळात पाण्याअभावी सुकू लागली आहेत. वाढत्या इंधन दरवाढीमुळे इंजिन किंवा इतर साधनांनी पाणी देणेसुद्धा शेतकर्‍यांना जिकिरीचे बनले आहे. परिणामी, पिके जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव— संतापाची लाट उसळली आहे.

इनामगाव, तांदळी या भागांमध्ये वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे, त्यामुळे काही शेतकर्‍यांनी मंगळवारी (दि. 8) थेट महावितरण कार्यालयात जाऊन 'सतत शिरूरच्या पूर्व भागातील वीजपुरवठा बंद का करता?' असा जाब अधिकार्‍यांना विचारला. सागर फराटे, सुभाष फराटे, अंकुश फराटे, धनंजय फराटे, किशोर फराटे, महेश फराटे, नानासाहेब भोईटे, तुषार फराटे, निखिल फराटे, संदीप महाडीक आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते. दरम्यान शेतकर्‍यांनी चालू वीजबिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे शाखाधिकारी एम. ए. मुलाणी यांनी केले आहे.

हे सरकार तरी वीजपुरवठा बंद करणे थांबवणार का?
यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतानादेखील वीज कनेक्शन तोडण्यात आली. त्या वेळी भाजपचे नेते वीजपुरवठा बंद करू नये असे वारंवार सांगत होते. अनेक ठिकाणी आंदोलनेदेखील केली गेली, पण आता शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता असतानाही वीजतोडीची कारवाई सुरू झाल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. 'हे सरकार तरी वीजपुरवठा बंद करणे थांबवणार का?' असाही सवालही शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

महावितरण कंपनीने शेतकर्‍यांची वीज तोडणे बंद करावे. सध्या शेतकरी अडचणीत आहे. तरकारी पिकांना बाजारभाव मिळत नाही. काहींचा गेल्या वर्षीचा कांदा तसाच अजून वखररीमध्ये सडून गेला आहे. रात्री-अपरात्री केव्हाही वीज येते. त्या वेळेस मात्र शेतकर्‍यांना रात्री शेतावर पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामध्ये शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढलेल्या आहेत. शेतकर्‍यांना शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करावा.

अशोक पवार, आमदार

सध्या महावितरणकडून थकित वीजबिल वसुलीसाठी विद्युत जोड तोडले जात आहेत. ट्रान्सफॉर्मर बंद केली जात आहे; मात्र शेतकर्‍यांच्या अनेक अडचणी आहेत. या अडचणी समजून घेऊन महावितरणने आवाहन करून कमीत कमी पैसे भरून वीजपुरवठा करावा, थेट वीजपुरवठा खंडित करू नये. 

सागर फराटे, ग्रामपंचायत सदस्य

उसाचे बिल अद्याप मिळाले नाही. अनेक शेतमालाला बाजारभाव नाही, शेतकर्‍यांकडे बिल भरण्यासाठी पैसे नाहीत. मात्र, महावितरण वारंवार शेतकर्‍यांवर अन्याय करून थेट विद्युतपुरवठा खंडित करत आहे. थेट खंडित करायचा कोणाचा आदेश आहे, याचे उत्तर महावितरणने द्यावे. सरकारने स्थगिती देऊन वीजबिल वसुली थांबवावी.
सुभाष फराटे, स्थानिक शेतकरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT