पुणे

उन्हाच्या झळांनी पिके लागली सुकू; शिरूरच्या बेट भागातील स्थिती

अमृता चौगुले

पिंपरखेड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मे महिन्यातील कडक उन्हाचा चटका चांगलाच जाणवत असून, ढगाळ वातावरणाबरोबर उन्हाच्या तीव्र झळांनी शेतातील पिके सुकू लागली आहे. पिकांची तहान भागवण्यासाठी शेतकर्‍यांना दोन ते तीन दिवसाला पिकांना पाणी द्यावे लागत असल्याचे चित्र बेट भागात पहायला मिळत आहे. बेटभागातील शेतात सध्या चारापिकांबरोबर उन्हाळी भुईमूग, ऊस तसेच तरकारी पिके आहेत. कडक उन्हाची तीव्रता आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊ शेतकर्‍यांनी पिकांचे नियोजन केले आहे.

सातत्याने येणारे ढगाळ वातावरण तसेच एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा वाढलेला पारा याचा परिणाम पिकांवर दिसत आहे. कडक उष्णता, पाण्याची टंचाई आणि भारनियमन अशा समस्यांना तोंड देत शेतकर्‍यांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे. मात्र, सध्याच्या कडक उष्णतेमुळे शेतातील उभी पिके पाणी दिल्यानंतरही सुकलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे पिकांना वरचेवर रात्री-अपरात्री पाणी देताना शेतकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कडक उष्णतेचा फटका ऊस, चारापिकांबरोबर, उन्हाळी भुईमूग पिकावर चांगलाच दिसत असून, हलक्या प्रतीच्या जमिनीतील भुईमूग पीक उष्णतेला लवकर बळी पडत असल्याने शेतकरी पिकांची काळजी घेताना पहायला मिळत आहेत.

SCROLL FOR NEXT