पुणे

कळस परिसरातील पिके पाण्याअभावी करपली

अमृता चौगुले

कळस(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : कळस परिसरातील पिके पाण्याअभावी करपून चाललेली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा खडकवासला कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या उन्हाळी आवर्तनाकडे लागलेल्या आहेत. जलसंपदा विभागाने शेतकर्‍यांचा अंत न बघता वेळेवर उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी मागणी कालव्याच्या लाभधारक गावातून होत आहे.

सध्या उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. त्यातच विहिरी, कूपनलिका, तलावासह इतर जलसाठे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे पिकांना गरजेचेनुसार वेळेवर पाणी देणे कठीण बनले आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. खडकवासला प्रकल्पात यंदा 100 टक्के पाणीसाठा होता. सध्या 40 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

उन्हाळी हंगामात शेतकर्‍यांनी शेतात मोठ्या प्रमाणावर पिके घेतलेली आहेत. या पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे खडकवासला कालव्याद्वारे उन्हाळी आवर्तन वेळेवर सोडल्यास पिकांना जीवदान मिळेल तसेच कालव्यालगतच्या गावोगावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होतील. त्यातून काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यामुळे जलसंपदा विभागाने शेतकर्‍यांचा अंत न बघता वेळेवर खडकवासला कालव्याद्वारे उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी मागणी कालव्यालगतच्या सर्वच लाभधारक शेतकरीवर्गामधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT