मांडवगण फराटा: शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात गुरुवारी (दि. 4) सायंकाळी झालेल्या वादळी व अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकर्यांच्या फळबागा झडल्या असून, ऊस व अन्य पिके भुईसपाट झाली आहेत.
मांडवगण फराटा, इनामगाव, बाभूळसर बु., वडगाव रासाई, कुरूळी, आंधळगाव, सादलगाव, शिरसगाव काटा , पिंपळसुट्टी, तांदळी, नागरगाव, गणेगाव दुमाला आदी गावांना अवकाळी वादळी वार्याचा फटका बसला.
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण झाले होते. अवकाळी पाऊस होईल या भीतीने अनेक शेतकरी धास्तावले होते. अखेर गुरुवारी सायंकाळी अवकाळीने जोरदार हजेरी लावली. वार्याने अनेक शेतकर्यांचे नुकसान केले.
मांडवगण फराटा येथील शेतकरी तुकाराम विश्वनाथ फराटे यांनी दोन एकरामध्ये दोडक्याची लागवड केली होती. त्यासाठी एकूण तीन लाख रुपये खर्च केला होता. सध्या दोडक्याच्या पिकाला चांगला बाजारभाव मिळत होता; पण अचानक आलेल्या जोरदार वादळी वार्यामुळे दोडक्याचे पीक भुईसपाट झाले आहे.
तसेच काढणीसाठी आलेल्या गहू पिकाचेदेखील नुकसान झाले. पूर्व भागात कांदा काढणी सुरू असून, अचानक जोरदार वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्यांची चांगली धावपळ झाली.
केळी, डाळिंब, मका, ऊस भुईसपाट
या अवकाळी पावसाने मांडवगण फराटा व परिसरातील गावांमधील तरकारी पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच केळी, डाळिंब बागांसह मका आणि ऊस भुईसपाट झाला. कांद्याचेही नुकसान झाले तसेच वादळी वार्याने विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. महावितरणाने तत्परतेने वीज खांब उभे करून काही गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत केला.
वादळी वार्यामुळे व पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत. अवकाळी पावसाने शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक शेतकर्यांनी कर्ज काढून तरकारी पिकांना खर्च केला आहे.-पांडुरंग फराटे, तालुकाध्यक्ष, रयत क्रांती संघटना
अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे ज्या शेतकर्यांच्या नुकसान झाले आहे, त्या शेतकर्यांच्या पिकांची पाहणी केली आहे. तसेच पुढील आदेश आल्यानंतर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवक या तिन्ही यंत्रणांच्या माध्यमातून नुकसानीचा पंचनामा करण्यात येईल.-अश्विनी वंजारे, कृषिसेविका