पुणे; पुढारी वृत्तसेवा : रॅपसाँग हा अलीकडील गाण्यात वाढत चाललेला ट्रेंड असला, तरी अश्लील भाषेतील, तसेच गुन्हेगारीचे उदात्तीकरण होऊ शकेल असे रॅपसाँगचे सादरीकरण तुम्ही करीत असाल, तर ते महागात पडू शकते. कारण अशाच प्रकारचे रॅपसाँग सादरीकरण करणार्या एका तरुणावर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ऋतिक मेहबूब शेख (रा.काकडे वस्ती, अपर इंदिरानगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी प्रदीप गाडे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी तरुण ऋतिक हा डान्सच्या शिकवणीचे वर्ग घेतो. त्याचबरोबर तो रॅपसाँगदेखील तयार करतो. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने एक अश्लील भाषेत रॅपसाँग तयार केले होते.
त्यामध्ये गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले होते. हा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर तो गुन्हे शाखेकडे आला होता. त्यानंतर पोलिसांनी ऋतिक याला शोधून काढले. त्याच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या पथकाने केली.
समाजमाध्यमांवर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याचे कृत्य करणार्यांवर पोलिसांचे लक्ष आहे, असे प्रकार निदर्शनास आले, त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल.
बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खंडणी विरोधी पथक