पुणे

Crime News : गोडावूनचा ताबा घेऊन मागितली 17 लाख खंडणी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रिंटिंग प्रेससाठी लागणारा माल ठेवण्यासाठी असलेल्या गोडावूनचा जबरदस्तीने ताबा घेऊन ते खाली करण्याच्या बदल्यात 17 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच त्याठिकाणी महापुरुषांचे फोटो
लावून ते काढण्याचा प्रयत्न केला तर विटंबना केल्याचा तुमच्यावर गुन्हा दाखल करेल, अशी धमकी एका व्यावसायिकाला देण्यात
आली आहे. याप्रकरणी, गुलटेकडी येथील 37 वर्षांच्या एका महिला व्यावसायिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्रिवेणी इंगोले, नामदेव घोरपडे व त्यांच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महर्षीनगरमध्ये 8 ऑक्टोबर 2023 रोजी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांचा छपाईचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी लागणारा माल ठेवण्याकरिता महर्षीनगर येथील जागा 2004 मध्ये रमेश सस्कर व त्रिवेणी इंगोले यांच्याकडून विकत घेतली आहे. त्याला म्हाडाने मंजुरीही दिली आहे. त्या जागेवर त्यांनी एक गोडावून बांधले. त्यात व्यवसायासाठी लागणारा माल ठेवत असतात. 8 ऑक्टोबर 2023 रोजी आरोपींनी गोडावूनचे शटर लॉक तोडून त्याला ताबा घेतला. त्रिवेणी इंगोले, नामदेव घोरपडे व इतर मोठमोठ्याने फिर्यादी विरोधात घोषणा देत होते. फिर्यादी यांनी विचारणा केल्यावर गोडावूनमध्ये पुन्हा पाऊल ठेवायचे नाही, तुम्ही येथे आलात तर तुमचे संपूर्ण कुटुंबीयांना जिवे ठार मारेल, अशी धमकी दिली.

त्यांनी नामदेव घोरपडे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केल्या असता फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते यांना 17 लाख रुपये रोख देत असाल तर त्यांच्याकडून गोडावून खाली करून देतो, असे सांगितले. अन्यथा त्या ठिकाणी मी महापुरुषांचे फोटो आणि झेंडे लावलेले आहेत. त्यांची विटंबना केली म्हणून तुमच्यावर गुन्हा नोंद करेन, मग काय करायचे ते मी करतो, अशी धमकी दिली. यातून आज ना उद्या काही तरी मार्ग निघेल व गोडावून खाली करून देतील, असे वाटल्याने फिर्यादींनी तक्रार केली नव्हती. त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली असून सहायक पोलिस निरीक्षक कारके तपास करीत आहेत.

कंपनीतून तांब्याच्या प्लेट चोरी

पिसोळी येथील एका कंपनीचा पत्रा उचकटून चोरट्यांनी 1 लाख 99 हजार रुपयांच्या तांब्याच्या प्लेट चोरी केल्या. याप्रकरणी, उंड्री पिसोळी येथील 33 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादींची यश अर्थगिं सोल्युशन प्रा.लि नावाची कंपनी आहे. तिचा पत्रा उचकटून चोरट्यांनी तांब्याची प्लेट चोरी केल्या. तसेच लोणीकाळभोर येथील चंदन पेंट अ‍ॅण्ड हार्डवेअरच्या छताचा पत्रा उचकटून 2 लाख 17 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी लालाराम सुरजमल चौधरी (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणीकाळभोर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डेअरीवर चोरट्यांचा डल्ला

कोंढवा गोकुळनगर येथील शिवदत्त डेअरी फार्मचे शटर उचकटून चोरट्यांनी चार लाख पाच हजारांची रोकड चोरी केली. ही घटना गुरुवारी (दि.23) घडली आहे. याप्रकरणी, सदाशिव येडबा वाघमारे (वय 57, रा. केदारेश्वर पार्क, कात्रज) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या डेअरीचे शटर लॉक लावून बंद होते. चोरट्यांनी ते तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील रोकड चोरी करून पळ काढला. हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादींनी कोंढवा पोलिसात तक्रार दिली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT