शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार व कोयत्यासह रिल्स बनवणार्या तिघा जणांवर शिक्रापूर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिसांनी सोशल मीडियातील फेसबुक, इंस्टाग्राम याची माहिती घेण्यास सुरुवात केली.
या वेळी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की शिक्रापूर हद्दीमधील महाबळेश्वर नगरमध्ये लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी सोशल मीडियावर रील्स बनवण्याकरिता तीन मुले हातात कोयता व तलवार घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. त्या ठिकाणी शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत दोन मुलांना एक कोयता व एक तलवारीसह ताब्यात घेतले, तर एकजण हातातील कोयता टाकून पळून गेला.
पोलिसांनी ओमकार ऊर्फ पांडा बाळासाहेब कुंभार (वय 23), दुर्वांश शिवाजी क्षेत्री (वय 23) ,दिलावर सुभान शेख (तिघेही रा. महाबळेश्वरनगर शिक्रापूर, ता. शिरूर) या तिघांवर गुन्हे दाखल केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, पोलिस उपाधीक्षक यशवंत गवारी, शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, पोलिस नाईक मिलिंद देवरे, अमोल नलगे, रोहिदास पारखे, विकास पाटील, शिवाजी चितारे, पोलिस जवान जयराज देवकर, निखिल रावडे, किशोर शिवणकर, लखन शिरसकर यांनी केली.