बारामती; पुढारी वृत्तसेवा : मानाजीनगर येथे आयोजित पीरसाहेब यात्रा उत्सवात आयोजित ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात राडा करणार्या नऊ जणांवर माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांनी केलेल्या दगडफेकीत चौघांना दुखापत झाली.
सचिन युवराज मेहता, जगदीश युवराज मेहता, मंगेश भानुदास जगताप, कैलास ऊर्फ भावड्या मारुती जगताप, भाग्येश पोपट कांबळे, शुभम रमेश पवार, पुष्पराज रमेश पवार, यश संजय होले, चेतन हरिदास जाधव व अन्य चार ते पाच अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रमोद हनुमंत जगताप यांनी फिर्याद दिली. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री घडली. मानाजीनगरमध्ये पीरसाहेब यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. 4 रोजी नांदवळकर यांच्या लोकनाट्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला. दि. 5 रोजी फिर्यादीने स्वखर्चाने थ—ी स्टार ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. त्यासाठी पोलिस ठाण्याकडून परवानगी घेतली होती. बाजारतळ येथे हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
ऑर्केस्ट्रा सुरू झाल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास काही टवाळखोरांनी दंगा सुरू केला. संयोजकांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्या वेळी हे नऊ जण त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यातून वाद झाला. सचिन मेहता याने तुमचा ऑर्केस्ट्रा कसा चालतो तेच बघतो, अशी दमदाटी केली. या वेळी संबंधितांनी दगडफेक केली. त्यात शांताबाई नामदेव पाटणकर, बायडाबाई अरुण घोडके, यमामबी नदाफ, संजय बाबुराव गेजगे आदींना दुखापत झाली. सचिन व जगदीश हे दोघे ग्रामस्थांच्या तावडीत सापडले. ग्रामस्थांनी त्यांना पकडल्यावरही त्यांनी शिवीगाळ, मारहाण केली. संतप्त जमावाने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.