पुणे : पोलिस करत असलेल्या कामात अडथळा आणून बेकायदेशीर जमाव जमवून ते करत असलेल्या कार्यापासून परावृत्त केल्याप्रकरणात खडक पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आलेल्या ललित ससाणे व विकी ससाणे याच्यासह इतरांवर खडक पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित ससाणे आणि अभिषेक ससाणे यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास स्वतः पोलिस निरीक्षक लोंढे करत आहेत. ललित ससाणे, विकी ससाणे व त्याचे इतर साथीदार यांनी आपापसात संगनमत ललित व त्याचे साथीदार यांच्यावर दाखल गुन्ह्याच्या तपासात दबाब निर्माण करण्याकरिता बेकायदेशीर जमाव जमवला व त्यांना जमावाने लोहियानगर पोलिस चौकी येथे येण्यासाठी चिथावणी दिली. जमावाच्या माध्यमातून तपासात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच, स्वतःच्या नावासमोरील गुन्ह्यात पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई करू नये, यासाठी संगनमताने लोकांच्या सह्या असलेले खोटे अर्ज तयार केले. तसेच, ते अर्ज खरे म्हणून जाणूनबुजून वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना दिले. लोंढे करत असलेल्या तपासात अडथळा निर्माण होईल, असे वर्तन केले. तसेच त्यांना कर्तव्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांना मिळालेल्या अर्जावरील सह्यांच्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिस माहिती घेत असताना व विचारपूस करत होते. त्या वेळी विकी ससाणे याने पोलिसांदेखत साक्षीदारांवर दबाव टाकून तुम्हीच सह्या केल्या असे सांगा, असा दबाव आणला. तसेच त्याने पोलिसांना तुम्ही लोकांचे नाव व पत्त्याबाबत चौकशी करू नका. आम्ही सर्व लोकांना पोलिस ठाण्यात घेऊन येत आहेत असे सांगितले. त्यानंतर ललित ससाणे, विकी ससाणे व त्याचे साथीदार हे लोहियानगर पोलिस चौकी येथे जमावाने आले. चौकीत आलेल्य व्यक्तींवर त्यांच्यासोबत आलेल्या लोकांवर दबाव टाकून त्या अर्जावर केलेल्या सह्या त्यांच्याच आहे असता दबाब टाकला. त्यांना जबाब देण्यास भाग पाडले. मात्र, त्या लोकांना त्यांच्या जबाबावर केलेल्या सह्या व अर्जावरील सह्या या पूर्णपणे वेगवेगळया असल्याचे दिसून आले. त्यानंतर स्वतंत्रपणे काही लोकांनी अर्जावरील नाव हे त्याचे आहे परंतु त्यावर केलेली सही त्यांनी केलेली नसल्याची सांगितले.