पुणे

पुणे : नामांकित सराफाच्या नावे स्टेट बँकेला गंडा; सायबर चोरट्यांनी बनावट मेल आयडी वापरून गंडविले

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नामांकित सराफी पेढीचे संचालक किशोरकुमार शहा यांच्या नावाने बँकेत फोन करून मेडिकल इमर्जन्सीच्या नावाखाली 'आरटीजीएस'द्वारे 19 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास लावून सायबर चोरट्यांनी स्टेट बँकेला 19 लाखांना गंडा घातला. याप्रकरणी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक आशिष जवखेडकर (वय 46, रा. बसंतबहार सोसायटी, बाणेर) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बंडगार्डन येथील मुख्य शाखेत नामांकित सराफाच्या नावाने कंपनीचे चालू खाते आहे. फिर्यादी हे 20 डिसेंबर रोजी बँकेत असताना त्यांना एका क्रमांकावरून फोन आला. आपण पेढीमधून संचालक किशोरकुमार शहा बोलत असल्याची त्याने बतावणी केली. त्यांच्याकडे फिक्स डिपॉझिटमध्ये 2 कोटी रुपये ठेवण्याबद्दल व्याजदराची चौकशी केली. त्यानंतर म्युचअल फंडामध्ये गुंतवणूक करावयाची असल्याचे सांगून सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये येण्यास सांगून आपण शहा बोलत असल्याचे त्यांच्या मनावर बिंबवले. त्यानंतर त्यांचे जवळचे नातेवाईक यांची मेडिकल इमर्जन्सी आहे.

त्यामुळे त्यांना 9 लाख 50 हजार आणि 7 लाख 55 हजार रुपये, असे 'आरटीजीएस' तत्काळ करावयाचे असल्याचे सांगून मेलवर त्या बँक खात्याची माहिती पाठविल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी बँकेला आलेला मेल तपासला. त्यात एचडीएफसी बँकेची दोन खाती दिली होती. कंपनीचे चेक बुक संपल्यामुळे त्यांना आरटीजीएसद्वारे तत्काळ व्यवहार करायचे आहेत, असे नमूद केले होते.

त्याच वेळी शहा यांचा वारंवार फोन येत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी घाईगडबडीत दोन्ही खात्यांवर प्रत्येकी 9 लाख 50 हजार रुपये, असे 19 लाख रुपये ई-मेलमध्ये सांगितलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम पाठविली. ती त्या बँक खात्यावर ट्रान्सफर झाली. तसे त्यांनी शहा यांना फोन करून सांगितले. तेव्हा त्यांनी त्याचे व्हाऊचर तयार ठेवा, मी बँकेमध्ये येऊन सही करतो, असे सांगितले.

त्यानंतर काही वेळाने पेढीच्या कंपनीतून तेथील कर्मचारी यांनी फोन करून हा आमच्या कंपनीचा ई-मेल नसून अशा प्रकारे कोणताही व्यवहार करण्याची परवानगी त्यांच्याकडून देण्यात आली नसल्याचे बँकेच्या सहायक व्यवस्थापकांना सांगण्यात आले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे 'आरटीजीएस' विभाग व एचडीएफसी बँकेचे 'आरटीजीएस' विभागास ई-मेल करून हा व्यवहार थांबविण्यास सांगितले. त्यानंतर एचडीएफसी बँकेतून यातील काही पैसे आयसीआयसीआय बँक खात्यामध्ये ट्रान्सफर झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्या बँकेला हे व्यवहार थांबविण्याचे कळविण्यात आले. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानकर अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT