पुणे

Pune News : बँकेची दादागिरी! लिमिट ३५ हजारांचे, वसुली ४७ हजारांची; ग्राहक आयोगाने बँकेलाच ठोठावला जबर दंड

तक्रारींना केराची टोपली दाखवत बँकेच्या वसुली पथकाने ग्राहकालाच धमकावले, आयोगाच्या प्रश्नांपुढे बँकेची बोलती बंद

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आधी क्रेडिट कार्डमधून पैसे गेले, मदतीऐवजी बँकेच्या वसुली पथकाने धमक्या दिल्या आणि सिबिल खराब करण्याची भीती दाखवून जास्तीचे पैसेही वसूल केले. मात्र, हा मनमानी कारभार एका खासगी बँकेला चांगलाच महागात पडला आहे. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बँकेला जोरदार दणका देत, ग्राहकाकडून वसूल केलेली संपूर्ण रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे, तर ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासापोटी २५ हजारांची नुकसान भरपाई देण्यासही बजावले आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी!

पिंपळे गुरव येथील रहिवासी सुभाष देऊसकर यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. १४ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांच्या क्रेडिट कार्डमधून ३५,२९९ रुपयांचा परस्पर व्यवहार झाल्याचा मेसेज आला. देऊसकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून कार्ड ब्लॉक केले. मात्र, बँकेच्या मोबाईल ॲपमध्ये पाहिले असता त्यांच्या नावावर तब्बल ४७,४८१ रुपये वापरल्याचे दिसले. कार्डची मर्यादा ३५ हजार असताना इतका मोठा व्यवहार झाल्याने त्यांना धक्काच बसला.

या फसवणुकीविरोधात त्यांनी बँक, सायबर पोलीस आणि रिझर्व्ह बँकेपर्यंत तक्रारी केल्या. पण या तक्रारींना केराची टोपली दाखवत बँकेच्या वसुली पथकाने उलट देऊसकर यांनाच धमकावण्यास सुरुवात केली. ‘पैसे भरा, नाहीतर सिबिल खराब करू,’ अशा धमक्या येऊ लागल्याने अखेर देऊसकर यांनी आपली पत वाचवण्यासाठी ४६,८९४ रुपये बँकेत भरले. पण बँकेची भूक इथेच थांबली नाही, उलट आणखी १४ हजार रुपये भरण्यासाठी त्यांच्यामागे तगादा लावण्यात आला.

आयोगाच्या प्रश्नांपुढे बँकेची बोलती बंद

अखेरीस, या त्रासाला कंटाळून देऊसकर यांनी ॲड. लक्ष्मण जाधव यांच्यामार्फत ग्राहक आयोगात धाव घेतली. सुनावणीवेळी बँकेने नेहमीप्रमाणे, ‘ओटीपीशिवाय व्यवहार होत नाही, ग्राहकानेच तो तिसऱ्या व्यक्तीला दिला असेल,’ असा युक्तिवाद करत हात झटकण्याचा प्रयत्न केला.

आयोगाने बँकेला काही बोचरे आणि थेट सवाल विचारले. क्रेडिट कार्डची मर्यादा ३५ हजार रुपये असताना ४७,४८१ रुपयांचा व्यवहार बँकेने मंजूरच कसा केला? फसवणूक ३५ हजारांची असताना ग्राहकाकडून ४७ हजारांपेक्षा जास्त वसुली कोणत्या आधारावर केली? जास्तीचे वसूल केलेले ११,८९६ रुपये नेमके कशाचे होते?

या प्रश्नांपुढे बँकेच्या प्रतिनिधींची बोलतीच बंद झाली आणि त्यांच्याकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नव्हते. बँकेचा निष्काळजीपणा आणि सेवेतील त्रुटी स्पष्टपणे दिसून आल्याने आयोगाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला.

आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल

या प्रकरणात, ग्राहक आयोगाने बँकेच्या मुजोरीला सणसणीत चपराक लगावली. आयोगाने बँकेला केवळ ग्राहकाकडून घेतलेले ४६,८९५ रुपये परत करण्याचे आदेश तर दिलेच, शिवाय ते ९% व्याजासह परत करण्यास बजावले आहे. इतकेच नव्हे, तर ग्राहकाला दिलेल्या नाहक त्रासाची आणि मानसिक छळाची किंमत म्हणून अतिरिक्त २५,००० रुपयांचा (१०,००० भरपाई + १५,००० खर्च) दंडही ठोठावला.

तक्रारदाराने सर्व नियमांचे पालन करूनही बँकेने त्यांना नाहक त्रास दिला. फसवणुकीचा बळी ठरलेल्या व्यक्तीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा हा प्रकार होता. अखेर ग्राहक आयोगाने आम्हाला न्याय दिला आणि बँकेच्या मनमानी कारभाराला चपराक लगावली.
ॲड. लक्ष्मण जाधव, तक्रारदाराचे वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT