शिरोली (ता. खेड) येथील पुणे-नाशिक महामार्गापासून जुन्या शिरोली गावठाणाकडे जाणार्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. डांबरीकरण रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करून नव्याने रस्ता तयार करण्याची मागणी केली जात आहे.
शिरोली गावचे जुने गावठाण हे भीमा नदीकाठाजवळ असून, गावठाणापासून काही अंतरावर गावचे जागृत व नवसाला पावणारे जाखमाता-अंबिकादेवीचे मंदिर आहे. सध्या नवीन गावठाण पुणे-नाशिक महामार्गालगत जागोजागी वसले आहे. परंतु, आजही गावची स्मशानभूमी व दशक्रिया घाट, देवीचे मंदिर जुन्या गावठाणाजवळ आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज महामार्गापासून गावठाणाकडे जाणार्या रस्त्याचा वापर करावा लागतो. महामार्गापासून जुन्या गावठाणापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला भेगा पडल्या असून, त्यामध्ये गवत उगवले आहे. काही ठिकाणी रस्ता खचला आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती केली नाही, तर भविष्यात रस्ता मोठ्या प्रमाणात उखडून वाहतुकीसाठी धोकादायक ठरणार आहे.
.
महामार्गापासून गावठाणापर्यंत सिमेंट रस्ता संपल्यावर पुढे भीमा नदी पुलापर्यंत आणि देवीच्या मंदिरापर्यंतच्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मंदिरापर्यंत जाणार्या रस्त्यावरचे डांबर निघून खडीचा रस्ता झाला आहे. या संपूर्ण रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. जाखमाता मंदिरालगत मंगल कार्यालय असल्याने लग्नानिमित्त या रस्त्यावरून वाहनांची सारखी वर्दळ सुरू असते. तसेच मांजरेवाडीचे ग्रामस्थही जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर करीत आहेत. त्यामुळे दुरवस्था झालेल्या संपूर्ण रस्त्याचे नव्याने काम होणे गरजेचे आहे
महामार्गापासून सुरू झालेला हा रस्ता अतिशय अरुंद असल्याने एकावेळी दोन चारचाकी वाहने रस्त्यावरून जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. भविष्यात रस्त्याचे रुंदीकरण होणे काळाची गरज आहे. परंतु, येथील जमिनीला आलेला सोन्याचा भाव पाहून भविष्यात रस्त्याचे रुंदीकरण करायचे झाल्यास रस्त्यालगतच्या शेतकर्यांना जमीन संपादनाचा मोबदला द्यावा लागणार आहे.