बावडा: इंदापूर तालुक्यात अलीकडच्या काही वर्षांपासून फळबागांचे उन्हाच्या तीव्र उष्णतेपासून संरक्षणासाठी व दर्जेदार फळ उत्पादनासाठी क्रॉप कव्हरचे आच्छादन तारणहार ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या उन्हाळी हंगामातील सूर्याच्या तीव्र स्वरूपाच्या सूर्यकिरणांमुळे फळबागांचे होणारे नुकसान या क्रॉप कव्हरमुळे टाळण्यात शेतकरी यशस्वी होताना दिसत आहेत.
पेरू, डाळिंब, द्राक्षे आदी सर्वच प्रकारच्या फळबांगासाठी क्रॉप कव्हरचा उपयोग आच्छादनासाठी केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सध्या रस्त्याने ये-जा करताना पांढर्या शुभ्र रंगांच्या क्रॉप कव्हरने झाकलेल्या फळबागा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या उन्हाळी हंगामातील तीव्र स्वरूपाच्या सूर्यकिरणांमुळे फळबागांचे होणारे नुकसान टाळण्यात या क्रॉप कव्हरमुळे शेतकरी यशस्वी होताना दिसत आहेत.
उन्हापासून संरक्षणामुळे फळास चकाकी वाढत असून, फळाच्या गुणवत्तेत वाढ होत आहे. त्याचबरोबर उत्पादनातही वाढ होत असल्याची माहिती निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजकुमार जाधव (सराफवाडी), दूधगंगा दूध संघाचे उपाध्यक्ष विक्रम कोरटकर (वकीलवस्ती), अमोल घोगरे, रमेश काकडे (बावडा), विलास ताटे देशमुख (निरा नरसिंहपूर) यांनी दिली. क्रॉप कव्हरचा वापर फळबागांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे या शेतकर्यांनी नमूद केले.
धूळ, जंतूपासून संरक्षण
फळबागांवर क्रॉप कव्हरमुळे डाळिंब बागेत तेल्या रोगासाठी प्रतिरोधक वातावरण राहत आहे. तसेच, वातावरणातून येणारी धूळ, जंतू यांचा फळाशी संपर्क रोखला जात असल्याने फळाच्या गुणवत्तावाढीस मदत होत असल्याचे माहिती घोगरे पाटील कृषी सेवा केंद्राचे चालक महावीर घोगरे (बावडा) यांनी दिली.