पुणे

पुणे : रश्मी शुक्ला तपासप्रकरणी कोर्टाचे पोलिसांवर ताशेरे

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील क्लोजर रिपोर्ट फेटाळल्यानंतर न्यायालयाने पुणे पोलिसांना पुनर्तपासाचे आदेश दिले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रकला पाटील यांनी 14 डिसेंबर रोजी याबाबत आदेश दिले आहेत. त्या आदेशात पुनर्तपासाबाबत आदेश पारीत करताना पुणे केलेल्या तपासावर ताशेरे ओढले आहेत. रश्मी शुक्ला याच्या विरोधातील क्लोजर रिपोर्ट फेटाळताना न्यायालयाने याबाबत तपास अधिकार्‍यांना जमविलेला पुरावा आणि माहितीच्या आधारे आणखी तपास करण्याचा आदेश दिला आहे. त्याबरोबरच आणखी पुरावे गोळा करण्याचा आदेश देताना त्यासंबंधीचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे म्हटले आहे.

दरम्यान, सर्व कागदपत्रे पुन्हा तपास अधिकार्‍याकडे सुपूर्त करण्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद करताना झेरॉक्सची कॉपी न्यायालयाच्या दफ्तरी दाखल करण्याचे नमूद केले आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात ठपका ठेवण्यात आला होता. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्तांनी तपास करून क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला होता.

म्हणून केला होता 'क' समरी अहवाल

तपास अधिकार्‍याने दाखल केलेल्या अहवालात जे मोबाईल नंबर टॅपिंगला लावले होते त्या मोबाईलद्वारे जी माहिती मिळाली ती कोठेही लिक झाली नाही. तसेच गुन्ह्यातील तथ्य आणि केसमधील परिस्थितीजन्य माहिती त्या आधारे तत्कालिन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कोणताही गुन्हा केला नसल्याचे नमूद करत 'क' समरी अहवाल दाखल केला होता. तपास अधिकार्‍याने दाखल केलेल्या 'क' समरी अहवालावर अतिरिक्त सरकारी वकील वाधवणे यांनीदेखील माहिती देणार्‍या व तपास अधिकार्‍याच्या अभिप्रायावर योग्य तो आदेश देण्याची मागणी केली.

संबंधित अधिकार्‍याचा जबाब महत्त्वाचा
याबाबत गुन्हे शाखेत काम करत असलेल्या अधिकार्‍याच्या नोंदविलेल्या जबाबात जे नंबर टॅपिंगला लावले होते त्याचा कोणताही संबंध ड्रग्ज सेलरशी नसल्याचे व ही बाब रश्मी शुक्ला यांना सांगितल्याचे म्हटले आहे. तो नंबर एका राजकीय व्यक्तीचा असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी तो नंबर तसाच 'ऑब्जर्वेशन'साठी ठेवण्याचे व झालेल्या संभाषणाबाबत कळविल्याचे म्हटले आहे.

पुरावे आढळल्याचे न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालयाने 'क' समरी अहवालावरून, त्यावेळी नोंदविलेल्या साक्षीदारांच्या जबाबावरून प्राथमिकदृष्ट्या रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुरावे आढळून येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. टॅप केलेल्या मोबाईल नंबरचे संभाषण एका सीडीमध्ये रेकॉर्ड केले होते ती सीडीच न्यायालयात जमा करण्यात आली नाही. तपास अधिकार्‍याच्या या गुन्ह्याच्या तपासातील ही त्रुटी असल्याबाबत ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे तथ्य आणि परिस्थितीजन्य पुराव्याआधारे या गुन्ह्यात तपास करण्यासाठी संधी असल्याचे नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT