पुणे; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक सुबत्तेचा अभाव आहे म्हणून कोणत्याही देशाची प्रगती थांबत नाही. त्या देशातल्या कुशल मनुष्यबळाने आपल्या क्षमता सिद्ध केल्या पाहिजेत. बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि विश्वासाच्या बळावरच देश प्रगतिपथावर जाईल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठ व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित 'अॅकॅडमिक लीडरशिप अँड गव्हर्नन्स' या विषयावरील दोनदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह आमदार डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील, सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे आदी उपस्थित होते.
डॉ. माशेलकर म्हणाले, सर्जनशीलता, नावीन्याचा ध्यास, गुणवत्तापूर्ण आणि समाजाला उपयुक्त ठरणारे दर्जेदार संशोधन यांची कास धरून स्पर्धेत टिकण्यासाठी भविष्यात सर्व विद्यापीठांना वाटचाल करावी लागणार आहे. या कार्यशाळेत राजस्थानच्या मारवाडी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संदीप संचेती, नारायणन रामास्वामी, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर मुंबईच्या संशोधन विभागाचे संचालक डॉ. संजय मेहेंदळे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूरच्या संशोधन विभागाचे संचालक डॉ. सी. डी. लोखंडे, माइंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर, श्री बालाजी विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. वाय. एम. जयराज, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. वेद प्रकाश मिश्रा, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, चार्टर्ड अकाउंटंट डी. व्ही. सातभाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कुलसचिव जी. जयकुमार यांनी आभार मानले.