देशाच्या पश्चिम सीमेवर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. मात्र, घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या मध्यवर्ती भागात सुरक्षा दलांच्या सततच्या प्रयत्नांमुळे हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. उत्तरेकडील सीमेवर परिस्थिती स्थिर असली, तरीही संवेदनशीलही आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आधुनिक उपकरणे, पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात असून, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचे सैन्य तयार आणि सक्षम आहे, अशी माहिती लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली.
खडकीतील बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या मैदानावर 77 वा आर्मी डे परेड सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. द्विवेदी म्हणाले, 2023 पासून दिल्लीबाहेर आर्मी डे परेड आयोजित करण्यात येत आहे. पुण्यात आयोजित केलेल्या 77 व्या आर्मी डे परेडला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठा साम्राज्याच्या काळापासून हा प्रदेश लष्करी शौर्याचे आणि संघर्षाचे प्रतीक आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर स्वदेशी लष्करी उपकरणे तयार केली जातात. या प्रदेशाने आम्हाला चार लष्करप्रमुख आणि शूर सैनिक दिले आहेत.
देशाची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी, विविध प्रांतातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सैन्यामध्ये महिलांच्या सक्षमी करणासाठी प्रयत्न सुरू आहेत, महिलांची केवळ अधिकारी पदांसाठीच नव्हे, तर महिला अग्निवीर म्हणूनही निवड केली जात आहे. यंदाच्या परेडमध्ये नेपाळी लष्कराच्या बँड पथकाचा सहभाग हे दोन्ही देशांमधील लष्करी आणि सांस्कृतिक संबंधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आर्मी डे परेडमध्ये झालेल्या सादरीकरणातील रोबो, वज— असे सारे काही भारतीय बनावटीचे होते. आज भारतीय लष्कराचा 85 टक्के भांडवली खर्च स्वदेशी बनावटीच्या उत्पादनावर होत आहे. संशोधन आणि विकास, उत्पादनासाठी पुण्याचे महत्त्व मोठे आहे. दारूगोळा, वाहन उत्पादन अशा सर्वच बाबतीत पुणे लष्करासाठी ‘पॉवर हाऊस’ असल्याचे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी (दि. 15) ‘आर्मी डे’निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. नंतर द्विवेदी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
लष्करप्रमुख जनरल द्विवेदी म्हणाले, दक्षिण मुख्यालय हे सर्वात मोठ्या मुख्यालयांपैकी एक आहे. देशातील 11 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेश, असा एकूण 41 टक्के भूभाग दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारीत येतो. नौदलाची तीन मुख्यालये, हवाई दलाची चार मुख्यालयेही दक्षिण मुख्यालयांतर्गत आहेत. संरक्षण क्षेत्रासाठीचे आवश्यक सर्व उद्योग दक्षिण मुख्यालयांतर्गत आहेत. त्यामुळे नव्या तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास, उत्पादन दक्षिण मुख्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होते. येत्या परिवर्तनाच्या काळात दक्षिण मुख्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.
यंदाच्या आर्मी डे परेडमध्ये नेपाळच्या लष्कराचे वाद्यवादन पथक पहिल्यांदाच सहभागी झाले होते. अन्य मित्रराष्ट्रांच्या पथकांना निमंत्रित करण्याबाबत
विचारले असता, लष्करप्रमुख म्हणाले, ‘नेपाळप्रमाणे अन्य मित्रराष्ट्रांना निमंत्रित करायला नक्कीच आवडेल. एका कार्यक्रमानिमित्त नेपाळला गेलो होतो, तेव्हा झालेल्या चर्चेवेळी नेपाळच्या लष्करप्रमुखांनी त्यांचे पथक भारताच्या आर्मी डे परेडला पाठवण्याचे, तर भारतीय लष्कराचे पथक नेपाळच्या आर्मी डे परेडला पाठवण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार यंदाच्या
आर्मी परेडमध्ये नेपाळच्या लष्कराचे वाद्यवादन पथक सहभागी झाले. येत्या काळात आणखी काही लष्करी बँड येऊ शकतील. अधिकाधिक संवादातून गरजेनुसार एकत्र काम करणे सोपे जाते.