राजगुरुनगर: राजगुरुनगर कृषी उपविभागातील जुन्नर आणि शिरूर तालुक्यात गेल्या काही वर्षांत कापसाचे क्षेत्र वाढत असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जुन्नर व शिरूर तालुक्यात कापसाचे सरासरी क्षेत्र 183 हेक्टर एवढे आहे. आज अखेर 527 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या 282 टक्के क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. तुलनेत कमी खर्च, रोगराई कमी व दर चांगले मिळत असल्याने शेतकरी कापूस पिकाकडे वळत आहेत.
महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ आणि खान्देशात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर येणारे हे पीक असून, कमी पाऊस पडणार्या भागात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. जुन्नर व शिरूर तालुक्यात कमी पाऊस पडणार्या भागातील शेतकरी कापूस उत्पादनाकडे वळाले आहेत. (Latest Pune News)
खरीप हंगामात दर वर्षी पुणे जिल्ह्यात आणि जुन्नर, आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते. परंतु, यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली. तो थांबत नसल्याने शेतजमिनीला वापसा मिळालेला नाही. यामुळे दर वर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र कमी झाले आहे. याउलट जुन्नर आणि शिरूर तालुक्यात अचानक कापसाच्या लागवडीत अधिक वाढ झाली आहे.
गेल्या एक-दोन वर्षांपासून साकोरी (ता. जुन्नर) सह लगतच्या गावांमध्ये कापसाची लागवड वाढत चालली आहे. कापसाला कमी पाणी लागते, इतर पिकांच्या तुलनेत लागवड खर्च व उत्पादन खर्च कमी, रोगराई फारशी येत नाही. त्यामुळे शेतकर्यांचा कल कपाशीकडे वाढत आहे. याशिवाय आता व्यापारी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन कापूस खरेदी करून रोख पैसे देतात.- महेश विश्वासराव, साकोरी
कापूस नगदी पीक असून, जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात बेल्हा, साकोरी, मगरूळ या परिसरात गेल्या काही वर्षांत या पिकाकडे शेतकरी वळत आहे. या वर्षी देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी कापसाची लागवड केली आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन व उत्पन्न देणारे पीक असल्याने शेतकर्यांचा कल कापसाकडे वाढत आहे.- गणेश भोसले, जुन्नर तालुका कृषी अधिकारी