पुणे

कॉपीमुक्त अभियान ! यंदा गैरप्रकारांना चाप; उद्या बारावीचा शेवटचा पेपर 

Laxman Dhenge
 पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षा म्हटले की, विविध विषयांचे पेपर व्हायरल होणे किंवा पेपर फुटणे, हे प्रकार ठरलेलेच असतात. परंतु, यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेला या प्रकारांचा फटका बसला नाही. मंगळवारी (दि. 19) बारावीचा शेवटचा पेपर आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कॉपी केसेस वगळता अन्य गैरप्रकारांना चाप लावण्यात यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च आणि बारावीची परीक्षा 21  फेब्रुवारी ते 19 मार्चदरम्यान घेण्यात येत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी कॉपी केसेस, बोगस विद्यार्थी सापडणे, सामूहिक कॉपी, पेपर फुटणे, पेपर व्हायरल होणे, असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. यंदा मात्र राज्य मंडळाने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या. यामध्ये राज्यमंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले.
त्याचबरोबर पेपर सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे जादा देण्याऐवजी पेपरच्या शेवटी 10 मिनिटे देण्यात आली. यामुळे पेपर व्हायरल होण्याचे प्रकार बंद झाले. रनर म्हणून खात्रीशीर व्यक्तीचीच नियुक्ती केली. रनर अर्थात कस्टोडियनला कस्टडीतून पेपर घेताना जीपीएस ऑन करायचे होते. त्याचबरोबर स्वत:च्या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडीओ शूटिंग करावे लागले. यातून त्या ठिकाणी होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसला. परीक्षा काळात फिरणार्‍या भरारी पथकातील सदस्यांना नवीन आय कार्ड देण्यात आले होते. त्याचबरोबर पथकात वरिष्ठ शिक्षकांचा समावेश करण्यात आला. त्याचा देखील चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले. दहावीच्या परीक्षेत इंग्रजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच सामाजिक शास्त्रे या विषयांना गैरप्रकार होण्याची शक्यता असते. यामधील विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच सामाजिक शास्त्रे या विषयांचे पेपर होणे बाकी आहे. तर, बारावीच्या परीक्षेत इंग्रजी, गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आदी पेपरला गैरप्रकार होण्याची शक्यता असते. हे सर्व पेपर सुरळीत पार पडले आहेत.

बारावीला 298, तर दहावीला 72 कॉपी केसेस

राज्यात बारावीच्या परीक्षेत 21 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत केवळ 298 कॉपी केसेस झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कॉपी केसेस छत्रपती संभाजीनगर या विभागीय मंडळात 139 झाल्या आहेत, तर सर्वाधिक कमी कोकण विभागात सात कॉपी केसेस झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेत 1 मार्च ते 16 मार्चदरम्यान आत्तापर्यंत केवळ 72 कॉपी केसेस झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कॉपी केसेस छत्रपती संभाजीनगर या विभागीय मंडळात 26 झाल्या आहेत, तर सर्वाधिक कमी मुंबई विभागात आक कॉपी केस झाली आहे. कोल्हापूर आणि कोकण विभागात तर एकही कॉपी केसचे प्रकरण घडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
परीक्षेशीसंदर्भात सर्व घटकांशी वारंवार चर्चा करण्यात आली. भरारी पथकांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याचबरोबर पेपर सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे देण्याऐवजी पेपरच्या शेवटी दहा मिनिटे जादा देण्याचा निर्णय आणि अफवा पसरविणार्‍यांवर कारवाईचा इशारा आदी कारणांमुळे यंदा पेपरफुटी किंवा पेपर व्हायरल होणे आदी मोठे गैरप्रकार टाळण्यास राज्य मंडळाला यश आले. सध्या केवळ बारावीचे पेपर संपत आहेत. दहावीचे पेपर सुरूच आहेत. त्यामुळे अजूनही कोणताही गैरप्रकार न होता परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य मंडळ प्रयत्नशील आहे.
– शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
 हेही वाचा
SCROLL FOR NEXT