पुणे

विकासकामांना सहकार्य करा : अजित पवार

अमृता चौगुले

पुणे/वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक विकासकामे करताना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ व्हावीत. तसेच वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे. पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम साधत शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा, विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, तसेच कामांमुळे बाधित होणार्‍या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. त्यामुळे नागरिकांनी विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अजित पवार यांनी शनिवारी सकाळी येरवडा येथील नदीकाठ सुशोभिकरण प्रकल्प, खराडी येथील ऑक्सिजन पार्क, खराडी येथील मल:निसारण प्रक्रिया प्रकल्प आणि महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आदींना भेट देऊन पाहणी केली. या वेळी आमदार सुनील टिंगरे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. शिल्पा प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

नदी सुधारची कामे करताना भविष्यातील पूरपरिस्थितीचा विचार करावा. अशी परिस्थिती उद्भवल्यास पाण्याचा प्रवाह अधिकाधिक वेगाने झाला पाहिजे, पायर्‍यावरील दगडात अंतर राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. या परिसरात विविध जातींची झाडे लावावी, नागरिकांच्या माहितीसाठी त्यांची नावे इंग्रजीसह मराठीत लिहावीत, ज्येष्ठ नागरिकांना सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा, तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने विचार करावा, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

ऑक्सिजन पार्कबाबत केल्या या सूचना

अधिकाधिक ऑक्सिजन देणार्‍या वृक्षांची लागवड करावी. विविधरंगी गवताची लागवड करावी. प्रेक्षक गॅलरीत सुटसुटीत बैठक व्यवस्था करावी. योगासनांसाठी जागा निश्चित करून त्या ठिकाणी लवकरात लवकर छत्र आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी. आरोग्याच्यादृष्टीने पदपथावर पेव्हर ब्लॉकऐवजी मातीचा वापर करण्याबाबत विचार करावा.

निर्णय कुणाचा, हे फडणवीस यांनी सांगितले

कंत्राटी भरतीचा निर्णय चांगला होता, मात्र, विरोधकांनी जाणीवपूर्वक त्याचा अपप्रचार केला. भरतीवरून युवकांमध्ये गैरसमज पसरवण्यात आला. त्यांना नोकर्‍या जाणार, अशी भीती घालण्यात आली. त्यामुळे कंत्राटी नोकरभरतीचा जीआर मागे घेण्याचा निर्णय घेतला. भरतीचा निर्णय कोणाचा होता, हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचेही अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

SCROLL FOR NEXT