पुणे: ताडी पिण्याच्या कारणातून झालेल्या वादात तिघांनी एका वृद्धाला बेदम मारहाण करून दरवाजाच्या लोखंडी चौकटीवर ढकलले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. वानवडी पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मलंग मेहबूब कुरेशी (वय 60, रा. कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याबाबत त्यांचा मुलगा सोहेल कुरेशी (वय 28) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अदिल शेख (वय 31), पांडा ऊर्फ पांडुरंग नामदेव पवार (वय 50) यांना अटक केली असून, आकाश धांडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. धांडे अद्याप फरार आहे. ही घटना वानवडीतील शांतीनगर येथे शुक्रवारी (दि.25) दुपारी साडेचारला घडली.
मलंग कुरेशी शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वानवडीतील शांतीनगर भागात एका ताडी विक्री दुकानात गेले होते. तेथे ताडी पित असताना आरोपींशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वेळी शेख, धांडे आणि पांडा यांनी कुरेशी यांना बेदम मारहाण केली. कुरेशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर कुरेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी घटनास्थळी भेट दिली.
तिघांनी वृद्धाला मारहाण केली होती. त्यामध्ये जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.- सत्यजित आदमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी