सीताराम लांडगे
लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील स्थानिक व परप्रांतीय नर्सरी व्यावसायिकांचा वाद विकोपाला गेला आहे. या वादातून आता स्थानिक नर्सरी व्यावसायिकांनी परप्रांतीय नर्सरी व्यावसायिकांना व्यवसायच करू न देण्याचा अजब पवित्रा घेतला आहे. करोडो रुपये गुंतवणूक केलेल्या परप्रांतीय नर्सरी व्यावसायिकांवर हे मोठे संकटच आले असून, पुणे शहर पोलिसांनी आपले संरक्षण करावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा नर्सरी व्यवसाय या भागात आहे.
हवेली तालुक्याच्या पूर्व भागात नर्सरी व्यवसायाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे, त्याची देशपातळीवर पकड आहे. येथील स्थानिक शेतकर्यासह अनेक उद्योजकांनी या व्यवसायात आपले बस्तान बसवले आहे. करोडो रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत आहे. या नर्सरींमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांतील मजूर काम करीत आहेत. मजुरीचे काम करतानाच त्यातील अनेकांनी मजुरांनी स्वतःची नर्सरी चालू केली आहे. अंदाजे पन्नास ते साठ मजूर नर्सरी मालक झाले.
मजूरच मालक झाल्याने स्थानिक नर्सरी व्यावसायिकांनी या परप्रांतीय नर्सरी व्यावसायिकांना त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. काहींना तर व्यवसाय बंद करण्यासाठी धमकावण्याचे प्रकार झाले आहेत. मारहाण करणे, रोपांची विक्री करून न देणे, आलेले रोप उतरू न देणे, वाहनांना रस्ता न देणे, नर्सरीचे नुकसान करणे, अशा प्रकारे त्रास देण्याचे काम सुरू झाल्याने अनेक परप्रांतीय नर्सरी व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. असाच त्रास सुरू झाला, तर या व्यावसायिकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. या व्यावसायिकांनी न्याय मिळावा म्हणून अनेकांची उंबरठे झिजविण्याचे काम सुरू आहे पोलिसांकडे गेले, तर पुन्हा धमकी दिली जाते. त्यामुळे या व्यावसायिकांनी पुणे शहर पोलिस आयुक्तांनी आम्हाला संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.
मारहाणीत झाला होता मृत्यू
नर्सरीत मजुरीचे काम करणार्या एका कुटुंबाला झाडाला बांधून महिलेसह मुलांना मारहाण करण्यात आली होती व या कुटुंबीयांना गावी पाठवून दिले, हे कुटुंबीय गावाला गेल्यानंतर मारहाण झालेला जखमी मजुराचा मृत्यू झाला होता, परंतु त्याच्या कुटुंबीयांवर दबाव आणून तक्रार दाखल करू दिली नाही. या प्रकरणाची चर्चा नर्सरी व्यावसायिकात दबक्या आवाजात सुरू आहे.
ज्या नर्सरी व्यावसायिकांना त्रास देण्याचे काम कोण करीत असेल, तर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा व तक्रार द्यावी. संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल.
– डी. एल. चव्हाण
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर