पुणे: कामे पूर्ण करूनही शासकीय कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले थकीत आहेत. त्यामुळे शासकीय कंत्राटदार वर्ग आर्थिक डबघाईला आला असून, काही कंत्राटदारांना तर आत्महत्येचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.
त्यामुळे शासनाने कामे पूर्ण केलेल्या कंत्राटदारांची थकीत बिले त्वरित द्यावीत, या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटदार असोसिएशनच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (दि. 19) निदर्शने करण्यात आली. थकीत बिले त्वरित मिळावीत; अन्यथा मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही दिला. (Latest Pune News)
पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे रवींद्र भोसले, कंत्राटदार महासंघाचे सुरेश कडू, बिल्डर्स असोसिएशनचे अजय गुजर, अभियंता संघटनेचे शैलेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या निषेध आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो कंत्राटदार सहभागी झाले होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन दिले.
मंत्र्यांच्या नातेवाइकांचा सहभाग
राज्यातील बहुतांश कंत्राटदारांची बिले थकीत असल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बिले वेळेत मिळत नसल्याने आर्थिक खाईत सापडलेल्या सांगलीतील एका कंत्राटदाराने आत्महत्येचा मार्ग पत्करला.
लातून जिल्ह्यातील अनेक ठेकदारांना बिलासाठी आमरण उपोषणास बसावे लागले. त्यामुळे ही बिले त्वरित मिळण्यासाठी अनेक कंत्राटदार आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात थकीत बिलांची रक्कम मिळण्यासाठी चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि गिरीश महाजन यांचे व्याहीसुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात यमराज व पोतराज यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
निधीचा तोडगा लवकर न निघाल्यास महाराष्ट्रातील सर्व कंत्राटदारांची बैठक होऊन सर्व जण मशीनरी घेऊन विधानसभेवरच मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शासन निधीची दखल घेण्यात यावी आणि यावरती तोडगा काढवा. तसेच बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया याप्रकरणी कोर्टातही आपली बाजू मांडत आहे.-रवींद्र भोसले, पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन